(विशेष लेख)
आदिवासी समाज हा एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असणारा समाज आहे.आदिवासी हा पूर्वीपासून निसर्गाच्या सानिध्यात दुर्गम,डोंगरी भागात वास्तव्य करीत असलेला समाज आहे.आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या समाजाचा आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक विकास हवा तेवढ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाहीत.कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे.परंतु,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही काही आदिवासी दुर्गम पाड्यातील विद्यार्थी संख्या असतांनाही कागदावरच शाळा भरते हे दुर्दैव.काही पाड्यात शिक्षक आहे तर विद्यार्थी शाळेत येत नाहीत.काही दुर्गम पाड्यात शिक्षकच नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी आहेत.आदिवासी दुर्गम पाड्यात दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या आहेत.वीज,पाणी,आरोग्य या मूलभूत सुविधा नाहीत.शाळेत पाणी,शौचालय व इतर मूलभूत सुविधा नाहीत.ज्या वयात मुले शाळेत पाहिजेत.परंतु,काही दुर्गम पाड्यातील मुले आर्थिक परिस्थितीने,घरातील, शेतातील कामे,गुरे चारण्यासाठी व ऊसतोड,रोजगारांसाठी जिल्ह्यात,परराज्यात हंगामात स्थलांतरीत होतात.यामुळेही मुलांचे शैक्षणिक नुकसान होते.आणि परिणामी काही मुलांचे अर्ध्यावरच शिक्षण सुटते.शासनाकडून माध्यन्ह भोजन,शिष्यवृत्ती व इतर उपाययोजना या अपुऱ्या असून व्यवस्थापनही ढिसाळ व भ्रष्ट आहे. तसेच,दारिद्र्य,अज्ञान,भौतिक सुविधेचा अभाव,मुलींची शिक्षणाबाबत उदासिनता,काही शिक्षकांच्या कामचुकारपणा,प्रशासनाची उदासिनता,वस्तीपासून शाळा लांब असल्याने दोन-तीन किलोमीटर पायपीट करून शाळेपर्यत पोहचावे लागते. यामुळे लहान मुले आकर्षित होत नाही.आदिवासी पाड्यातील शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक,पालक,ग्रामस्थ,समाजबांधव यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी सकस आहार योजना प्रभावीपणे राबवणे,वर्षाचा सुरूवातीस शिष्यवृत्या देऊन प्रेरणा देणे,भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे,विदयार्थ्यांना शाळेत गोडी वाटावी यासाठी अध्यापन करतांना नवनवीन तंत्र वापरून आनंददायी शिक्षण देणे,गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे,पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन दररोज शाळेत पाठवणे,अंगणवाडी पासूनच बालसंस्कार रुजवून मुलांची वाढ,पोषण,स्वास्थ्य व शिक्षणाकडे पालकांसह अंगणवाडी सेविका,शिक्षक यांनी अधिक लक्ष देणे व इतर नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.आदिवासी दुर्गम पाड्यातील काही शाळा चांगल्याही आहेत.पण,त्या बोटावर मोजण्याइतक्याच.शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शिक्षणापासूनच चांगला हवा आहे.यासाठी परिस्थितीवर मात करून पालक,समाज आणि शिक्षक यांच्या भूमिका फार महत्वाच्या आहे.
ज्ञमहाराष्ट्र राज्य सरकारने डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या,आर्थिक,शैक्षणिक, सामाजिक,प्रगतीसाठी सन १९७२-७३ पासून क्षेत्र विकासाचा दृष्टीकोन ठेवून अशा भागाचा विकास व्हावा यासाठी आदिवासी विदयार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करण्यात आली.आज महाराष्ट्रात आदिवासी विभागातंर्गत ४९९ शासकीय आश्रम शाळा कार्यरत आहेत.तसेच,आदिवासी क्षेत्रात ४५० पेक्षा अधिक अनुदानित आश्रम शाळा आहेत.काही वर्षापूर्वी एकलव्य निवासी शाळाही निर्माण करण्यात आल्या.आदिवासी समाजापर्यंत शिक्षणाचा प्रवाह घेवून जाण्याची जबाबदारी या शाळांवर सोपवण्यात आली.परंतु,अपवाद सोडला तर काळाच्या ओघात या शाळा कुठे तरी कमी पडत आहेत;याची जाणीव होते.वास्तविक परिस्थिती जवळून पाहिली,तर आजही आश्रम शाळेत पाहिजे तेवढ्या मूलभूत सुविधा नाहीत,अनेक आश्रम शाळेत जेवणाचा निकृष्ट दर्जा,आरोग्याची नीट काळजी घेतली जात नाही,आरोग्य तपासणी,पाणी, निवासाची सोय,शौचालय व इतर भौतिक सुविधेचा अपुऱ्या असून,शैक्षणिक साहित्याचा अभाव,रिक्त पदे वर्षानुवर्षे भरली जात नाहीत,एखाद्या विषयांचे शिक्षक नसल्याने वर्षभर अध्यापन होत नाही,खालवलेली शैक्षणिक गुणवत्ता,आदिवासी विभागातील कामात होणारी दिरंगाई, उदासीनता,लैंगिक अत्याचाराची प्रकरणे,गेल्या पाच वर्षात आश्रम शाळेत २८२ मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे,हे अतिशय वेदनादायी आहे.अशी विदारक परिस्थिती आजही आहे.आश्रम शाळेतील या गरीब मुलांची प्रगती,आरोग्य आणि सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी टिकावेत यासाठी प्राथमिक शाळेपासूनच तयारी करावी लागेल.गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण निर्माण करावे लागेल.आजची पिढी उद्याच्या समाजाचे,देशाचे भवितव्य आहे.यासाठी फक्त शालेय स्तरावरूनच नव्हे तर सामाजिक स्तरावरून अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.शालेय व सामाजिक स्तरावरून मार्गदर्शन शिबीरे,विविध कृती कार्यक्रम,यशस्वी झालेल्या विदयार्थ्यांचे मार्गदर्शन,शैक्षणिक स्पर्धा,क्रीडा संम्मेलने,चित्रकला स्पर्धा,शिक्षणाचे महत्त्व व इतर नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळायला हवा.विदयार्थ्यांनीही शासकीय सवलतीच्या संधीचे सोने करून,खूप अभ्यास करून चांगले भविष्य घडवावे.तसेच,शिक्षणाचे महत्व ओळखून पालक,समाजबांधव,नोकरदार,बुद्धीजीवी वर्ग,समाजसेवक यांनी सतर्क राहून आदिवासी भागातील शाळा कायम जिवंत राहतील व शाळेत शैक्षणिक वातावरण राहून विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.