नंदुरबार - प्रेरणा मंत्राचे पठण करीत आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत आज दिनांक 2 जून 2023 रोजी हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने प्रतिमा पूजन करून 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रपुरुषांच्या जयंतीदिनी असे उपक्रम घेऊन सातत्याने राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याविषयी जागृती घडविली जाते. त्या अंतर्गतच जुनी नगर पालिका बाहेरील शिव स्मारक येथे हे प्रतिमा पूजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात प्रथम जितेंद्र मराठे यांनी प्रेरणा मंत्राचे पठण केले त्यानंतर डॉक्टर मनोजराज परदेशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून माल्य अर्पण करण्यात आले. सुमित परदेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदू स्वराज्य विषयी माहिती दिली. त्यावेळी ते म्हटले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा खजीना ! त्यांच्या गुणांचा जेवढा अभ्यास करावा, तेवढा अल्पच आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शालीनता आणि सुसंस्कार यांची जोड होती. स्वराज्यातील जनतेला औदार्य दाखवतांना त्यांनी कुठेच भेदाभेद केला नाही. संत-महंतांच्या मठांना इनामे दिली. ब्राह्मणांनाही त्यांनी आदराचे स्थान दिले; मात्र ते चुकल्यावर त्यांच्या विरोधात कृती करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. कठोरात कठोर निर्णय घेतांना प्रसंगी मृदुपणाही दाखवला. ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर सर्वांची सुंता झाली असती’, हे कवी भूषण यांचे वचन आजही आपल्याला छत्रपती शिवरायांचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे सांगते. ‘हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे’, असे घोषित करण्याचा आग्रह आजची हिंदू जनता करते, हे त्याचेच द्योतक आहे. पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी ‘जयिष्णु वृत्ती’ हिंदु समाजात निर्माण करणारा मध्ययुगीन ‘हिंदुस्थानचा पहिला सार्वभौम सत्ताधीश’ म्हणून इतिहासाने छत्रपती शिवरायांचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले आहे. असे मार्गदर्शन उपस्थितांना त्यांनी केले.
त्यानंतर उपस्थित सर्वांनी हिंदुराष्ट्र स्थापनेची शपथ घेतली व अत्यंत उत्साहात छत्रपती शिवरायांचा जयघोष केला. जितेंद्र मराठे यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.