सातपुडा मिरर....
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी (25 में) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ 75 रुपयांचं नाणं (Rs 75 Coin) जारी केलं जाणार असल्याची घोषणा केली.
75 रुपयांचं नवीन नाणं कसं असेल?
अधिसूचनेनुसार, 75 रुपयांचे नाणं गोल आकाराचं असेल आणि त्याचा व्यास 44 मिमी असेल. 75 रुपयांचं हे नाणं चार धातूंच्या मिश्रणातून बनलेलं असेल, ज्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक वापरलं जाणार आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणं बनवण्यात आलं आहे.
नाण्याच्या पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयतेचा लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि इंग्रजीमध्ये India असं लिहिलेलं असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र कोरलेलं असेल आणि त्याखाली 2023 हे वर्ष लिहिलं जाईल. संसद भवनच्या वरच्या बाजूला हिंदीत 'संसद संकुल' आणि खालच्या बाजून इंग्रजीमध्ये 'Parliament Complex' लिहिलेलं असेल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.