सातपुडा मिरर.......
दि ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शबरी सेवा समिती प्रमोद करंदीकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील १० तालुक्यातील ७२ गावांमध्ये विविध प्रकारच्या झाडांचे बियाणे लावले आहे. चिंच, आंबा, बोर, जांभूळ, सिताफळ, करंज, शिवण, पळस, बेहडा, बाभूळ, टेंभू,चारोळी,आळीव, कडूनिंब,हिरडा, कुसुंब अशा विविध 30/32 प्रकारची पर्यावरण पूरक स्थानिक झाडांचे बी जमा करून आपण लावलेआहेत. कर्जत, जव्हार, वाडा, विक्रमगड, शिरपूर, धडगाव,अक्कलकुवा, तळोदा, नवापूर, नंदुरबार अशा 10 तालुक्यात 72 गावात हे बियाणे लावून ख-या अर्थाने पर्यावरण दिवस साजरा केला. गावाजवळील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूला,शाळेच्या आवारात शेताच्या बांधावर,माळरानावर, ओसाड टेकड्यांवर जेथे जागा मिळेल तेथे हे बियाणे लावले. विशेष करून शाळेतील लहान लहान मुले या कामात उत्साहाने सहभागी झाले होते. पण त्याच बरोबर महिला, शेतकरी, तरुणही मदतीस आले होते.
लवकरच पावसाचे आगमन होईल. हे लावलेले बियाणे अंकुरित होतील, तरारून वर येण्याचा प्रयत्न करतील. या लावलेल्या शेकडो, हजारो बियांपैकी किमान काही झाडे तरी निश्चितच जीवन मरणाच्या संघर्षांत आपले अस्तित्व टिकवून ठेवतील. त्यातच या लहान बालकांना व आपल्याला एक आगळे वेगळे समाधान आहे.
आज अनेक अनेक फोटो माझेकडे आले आहेत. ही चिमुकली बालके पाऊस पडल्यानंतर काही दिवसांनी येथे अगदी निश्चितच येणार आहेत. नवीन अंकुरलेली कोवळीक पहायला. त्या नाजुक , कोवळ्या अंकुरांना डोळ्यात, ह्रदयात जपून ठेवायला.