महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर्फे नाशिक येथे संगणक प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा
नाशिक दि १३ (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा 11 एप्रिल 2025 शुक्रवारी पार पडली.
एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ICT Project Head राफिया रेशी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिक विभाग प्रमुख श्री अजित धसाडे व जिल्हा व्यवस्थापक श्री दीपक पाठक व तालुका व्यवस्थापक श्री गिरीष भोई तसेच विभागातील सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, तसेच संगणक प्रशिक्षक उपस्थित होते.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचे आयसीटी प्रशिक्षक व जिल्हा समन्वयक उपस्थित होते. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात आयसीटी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान व्हावे, या उद्देशातून समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोग शाळा व संगणक प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होणार असून, त्यांची पूर्वतयारी यासंदर्भात संगणक प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मागे राहू नयेत याची खबरदारी घेणे, शालेय अभ्यासासोबत संगणक व इंटरनेट यांच्या मदतीने शालेय अध्यापन करणे, अशा विविध बाबींबद्दल या एकदिवसीय शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले.
विषय शिक्षकांना त्यांच्या विषयात संगणकाची मदत देत अध्यापन कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शाळेमध्ये शालेय कामकाजात संगणकाची मदत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन असलेले ई-लर्निंग सॉफ्टवेअर यांचे प्रशिक्षण देण्यात आले.