तळोदा (प्रतिनिधी)येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘भव्य हिंदू संमेलन’ मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भगवा चौक, प्रतापूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व हिंदू परंपरेनुसार पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून सनातन धर्म प्रचारक आचार्य सुबेदानंदजी महाराज (धारेश्वर धाम) यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सनातन धर्माचे महत्त्व, भारतीय संस्कृतीची परंपरा आणि समाजातील नैतिक मूल्ये जपण्याची गरज यावर सखोल विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड. प्रितम मनीषा प्रविण निकम, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, यांनी प्रभावी भाषणातून समाजातील एकजूट, संघटन व जागरूकता यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विशेषतः तरुण पिढीने आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगून सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संमेलनामध्ये हिंदू संस्कृती, सनातन धर्म, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकात्मता या विषयांवर विशेष भर देण्यात आला. वक्त्यांनी समाजातील भेदभाव दूर करून एकत्र येण्याचे, परंपरा जपण्याचे आणि नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या दरम्यान वातावरणात उत्साह, श्रद्धा आणि एकात्मतेची भावना स्पष्टपणे जाणवत होती.
कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, प्रतापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. आयोजन समितीने उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम सुरळीत पार पाडला. उपस्थितांच्या सोयीसाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या भव्य हिंदू संमेलनामुळे प्रतापूर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जागृतीला नवी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढून परस्पर सहकार्याची भावना दृढ होते, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
‘भव्य हिंदू संमेलन’ हा कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि समाजहिताच्या संदेशाने परिपूर्ण ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन अधिक प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया -
"भगवान रामांनी निषादराजाला आपला मित्र मानून समानतेने वागणूक दिली. त्यातून समाजात समरसता आणि बंधुभाव कसा असावा, याचा आदर्श मिळतो." —सनातन धर्म प्रचारक आचार्य श्री. सुबेदानंदजी महाराज (धारेश्वर धाम)