Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

२१ गावांमध्ये शेतकरी क्षेत्रीय दिनाचे आयोजन; ३७४ शेतकऱ्यांचा सहभागअफार्म संस्था व कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने खरीप पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

नंदुरबार दि १५ (जिल्हा प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक फायदेशीर व शाश्वत बनविणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनातील सुधारित पद्धतींची माहिती देणे या उद्देशाने एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत खरीप हंगामातील शेतकरी क्षेत्रीय दिनाचे दुसरे सत्र आयोजित करण्यात आले. अफार्म (AFARM) संस्थेच्या माध्यमातून व कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या अर्थसहाय्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील दोन क्लस्टर आणि अक्कलकुवा तालुक्यातील एका क्लस्टरमधील एकूण २१ गावांमध्ये शेतकरी क्षेत्रीय दिन सत्रे घेण्यात आली. या उपक्रमात ६१६ महिला आणि ४६५ पुरुष असे एकूण १०८१ शेतकरी सहभागी झाले.
या क्षेत्रीय दिनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस, मका, भात, भुईमूग व मंडपशेती या पिकांचे व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती व वापर, खतांचे संतुलित व्यवस्थापन, पाणी बचतीचे तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि बाजारपेठ व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप पिकांची सद्यस्थिती आणि पीक व्यवस्थापन

खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध पिकांमध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला. कापूस, मका, भात, भुईमूग आणि मंडपशेती या पिकांची सद्यस्थिती, पिकांच्या वाढीच्या अवस्था, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि पीक उत्पादनावर होणारे संभाव्य परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली.

पेरणीपूर्व मशागत, जमिनीची सुपीकता, योग्य पीक व्यवस्थापन, खतांचा योग्य वेळी वापर, पिकांची नियमित पाहणी आणि काढणीपर्यंत घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पिकांच्या परिस्थितीनुसार योग्य वेळी निर्णय घेणे आणि अनावश्यक खर्च टाळणे यांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

कमी खर्चातील खत व्यवस्थापन व सेंद्रिय निविष्ठांचे प्रात्यक्षिक

शेतीचा वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून कमी खर्चात कृषी निविष्ठा तयार करण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. जीवामृत, शेणकाला रबडी, अमृतपाणी, गांडूळखत, नाडेप कंपोस्ट आणि S9 कल्चर यांसारख्या निविष्ठांची निर्मिती, वापर आणि उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांमधील फरक, हिरवळीच्या खतांचा वापर, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व आणि एकात्मिक सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापन यांची माहिती देण्यात आली. पिकांच्या गरजेनुसार खतांचा वापर करणे, जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम उपयोग करणे यावर भर देण्यात आला.

पाणी व्यवस्थापनातून पाण्याची बचत
     शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांना आवश्यक तेवढे पाणी देणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेन पाइप आणि आच्छादन तंत्रज्ञानाच्या वापराविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
पिकांच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केल्यास पीक व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होते, याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर विशेष भर

पिकांवरील किडींची ओळख, त्यांचे जीवनचक्र (Life Cycle), किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे आणि आर्थिक नुकसान पातळी (Economic Threshold Level) याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. किडींचे नियंत्रण करण्यासाठी योग्य वेळ निवडणे आणि अनावश्यक कीटकनाशक फवारणी टाळणे यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

यावेळी राखेची धुरळणी, दशपर्णी अर्क, लमित अर्क, निंबोळी अर्क आणि कांदा संजीवक यांसारख्या पर्यायी उपायांची माहिती देण्यात आली. तसेच पिवळे चिकट सापळे, प्रकाश सापळे, फेरोमोन सापळे आणि पक्षीथांबे यांच्या वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पिकांमध्ये आढळणारे मित्र कीटक, त्यांचे नैसर्गिक कीड नियंत्रणातील योगदान आणि उपयुक्त कीटकांचे संवर्धन याविषयीही माहिती देण्यात आली. रासायनिक कीटकनाशके व सेंद्रिय कीडनियंत्रक यांच्या वापरातील फरक, योग्य वापराची पद्धत आणि आवश्यक सुरक्षितता याबाबत चर्चा करण्यात आली. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून पिकांचे नुकसान कमी करणे आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे हा या मार्गदर्शनाचा प्रमुख उद्देश होता.

काढणीपश्चात तंत्रज्ञान व बाजारपेठ व्यवस्थापन

शेतमालाचे उत्पादन घेण्याबरोबरच त्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि बाजारपेठेत योग्य मोबदला मिळविण्यासाठी काढणीपश्चात व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. पिकांच्या योग्य परिपक्वतेनुसार काढणी करणे, शेतमालाची सुरक्षित हाताळणी, वाहतूक, स्वच्छता (Cleaning), प्रतवारी (Grading) आणि योग्य साठवणूक या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

आधुनिक काढणी साहित्याचा वापर, शेतमालाची गुणवत्ता सुधारणे, साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी करणे आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार माल तयार करणे यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. शेतमाल विक्रीपूर्वी प्रतवारी व गुणवत्ता व्यवस्थापन केल्याने बाजारपेठेतील संधींचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येऊ शकतो, याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

शेतकरी यशोगाथा, शंका निरसन व शासकीय ॲप्लिकेशन्सची माहिती

क्षेत्रीय दिनादरम्यान यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून सुधारित कृषी पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी, पिकांवरील कीड व रोग, खत व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर आणि पाणी व्यवस्थापन यासंबंधीच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे अभिप्राय जाणून घेऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि कमी खर्चातील तंत्रज्ञानाच्या वापराविषयी चर्चा करण्यात आली. याशिवाय विविध शासकीय कृषी ॲप्लिकेशन्स, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उपलब्ध कृषी सुविधांची माहिती देण्यात आली.

शाश्वत शेतीकडे वाटचाल

एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत आयोजित या क्षेत्रीय दिनामुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची माहिती मिळाली. सेंद्रिय निविष्ठांचा योग्य वापर, खत व पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड नियंत्रण, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि बाजारपेठ व्यवस्थापन यांचा समन्वय साधून शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

शेतीतील अनावश्यक खर्च कमी करणे, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करणे, पिकांचे नुकसान टाळणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. शेतकऱ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमात अफार्म संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे, कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार आणि कृषी अधिकारी शिवाजी पावरा यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले.