Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिरसा फायटर्सचा खड्ड्यांसमोर घंटानाद आंदोलनचा इशारा

दापोली दि ३१(प्रतिनिधी)
विद्यानगर नर्सरी रोड पांगारवाडी-जालगांव  रस्त्याची दुरावस्था;वाहनचालन त्रस्त 
प्रशासन व लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष रस्ता डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी खड्ड्यांसमोर घंटानाद आंदोलन करण्याचा बिरसा फायटर्सचा इशारा

         जालगांव ता दापोली ग्रामपंचायत हद्दीला लागून असणारा  दापोली हून विद्यानगर नर्सरी रोड पांगारवाडी कडे जाणारा 500 मीटरचा खड्ड्यांचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करून दुरूस्त करावा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी तहसीलदार दापोली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे  केली आहे.या मागणीचे निवेदन जालगांव ग्रामपंचायतचे सरपंच यांनाही देण्यात येणार आहे.
                 निवेदनात म्हटले आहे की,  ग्रामपंचायत जालगांव हद्दीला लागून असणारा दापोली हून विद्यानगर नर्सरी रोड  पांगारवाडी कडे जाणारा 500 मीटरचा रस्ता खूपच खड्डेमय झाला आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही.सदर रस्ता कृषी विद्यापीठ दापोलीला लागून असून लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजच येणे जाणे होते.सदर रस्ता कृषी विद्यापीठ दापोलीने ग्रामपंचायत जालगांव कडे वर्ग केल्याचे समजते.सदर रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.गणेशोत्सव च्या कालावधीत लोकांना दाखविण्यासाठी  रस्त्यावर डबर-माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले जातात. गणेशोत्सव संपल्यानंतर रस्त्याची अवस्था  जैसे थे होते. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे झाले आहेत.रस्त्याची खूपच दुरावस्था झाली आहे.रस्यावर मोठे वाहन आले की,प्रचंड मातीचा धुराळा उडून रस्ता अंधारमय होतो.मातीचा धुराळा वाटसरू व वाहनचालकांच्या नाकात व  डोळ्यात जाऊन त्रासदायक होतो.या रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.
                     जालगांव  मध्ये राहणारे अनेक प्रतिष्ठित व मोठ्या पदावर असणारे व्यक्ती याच मार्गाने रोजचे ये जा करतात. तरीही हा रस्ता दुरुस्त का केला जात नाही?या रस्त्याचा कोणी वाली नाही का? हा रस्ता एवढा खड्डेमय झाला आहे तरी दूर्लक्षित का? असा प्रश्न जालगांव पांगारवाडीतील नागरिक उपस्थित करीत आहेत.सदर रस्त्याची खूपच दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.वाहनचालक खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. 
 म्हणून दापोली पासून विद्यानगर नर्सरी रोड पांगारवाडी कडे जाणारा 500 मीटर  मधला रस्ता तात्काळ डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास करण्यात आली आहे.रस्ता दुरुस्त न केल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून रस्याच्या खड्यासमोरच घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.