नंदुरबार दि ३० (प्रतिनिधी)महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या या प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात 12 हजार 74 पात्र खातेधारक असून पोर्टलवर 7 हजार 114 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून 6 हजार 507 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. आतापर्यंत 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांच्या लाभ देण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातील 1 हजार 682 शेतकऱ्यांना (7 कोटी 63 लाख 95 हजार 979),
शहादा 2 हजार 947 शेतकऱ्यांना ( 13 कोटी 91 लक्ष 22 हजार 681) नवापूर 570 शेतकऱ्यांना (2 कोटी 20 लक्ष 10 हजार 309) तळोदा 360 शेतकऱ्यांना (1 कोटी 74 लक्ष 93 हजार 440) अक्कलकुवा 52 शेतकऱ्यांना (22 लाख 84 हजार 182 रुपये) आणि अक्राणी तालुक्यातील 132 शेतकऱ्यांना (40 लाख 23 हजार 944 रु.) लाभ देण्यात आला आहे
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र झाले आहेत.