संभाजीनगर येथे जाळपोळ नंतर पोलीस अलर्ट, तपास करण्यासाठी 10 पथके कार्यरत
संभाजी नगर शहरातील किराडपुरा येथे काल रात्री 12.30 वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. या राड्यात 20 गाड्या जाळण्यात आल्या. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. दोन गटात धक्का लागल्यावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर बघता बघता दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत पोलिसांची वाहने जाळली. त्यामुळे औरंगाबादमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा पथके स्थापन केली असून या समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे.
काल रात्री संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथे हा राडा झाला. मंदिराच्या बाहेर दोन गटात गाडीला धक्का लागल्यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देत एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुण काही लोकांना घेऊन आले. त्यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली आणि त्यांचं पर्यावसान दंगलीत झालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर तुफान दगडफे करण्यात आली. काही लोकांनी खासगी वाहने पेटवून दिली. त्यामुळे तणाव पसरला होता परिस्थिती आटोक्यात आहे.