बीएड कॉलेज असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.व्ही.आर्य म्हणाले की, पुढील वर्षीपासून पदवी अभ्यासक्रमासह बीएडचे एकत्रीकरण केल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी चूरशीची स्पर्धा होणार आहे. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रवेश मिळणार आहे, कारण पुढील वर्षीपासून हा कोर्स चार वर्षांचा असेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षक होण्यासाठी बीएड करणे बंधनकारक असणार आहे.बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना 'बीएड'च करावे लागणार आहे. 'बीएड'मध्ये आता स्पेशलायझेशन असणार आहे. केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्याता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून 2023-24 पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.
बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही.
सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार, तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा ठरलेली आहे. मात्र आता, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे यानुसार विद्यार्थ्यांना विषय निवडण्यास वाव मिळणार आहे. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक विभागाचे शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे. मात्र आता शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे.