तळोदा दि ३ (प्रतिनिधी) पोलीस स्टेशन तळोदा येथे पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी परिवर्तन युवा मंचतर्फे निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तळोदा पोलीस स्टेशन येथिल पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांची बदली होऊन महिना उलटला तरी नवीन पोलीस निरीक्षक रुजु नाहीत. तळोदा शहराचा विकास झपाट्याने होत असुन शहराची लोकसंख्या २९ हजार आहे. तसेच ९२ गावे तळोदा तालुक्यात आहेत.
याच महिन्यात ४ अप्रिल महावीर जयंती, ६अप्रिल हनुमान जयंती, ७ एप्रिल गुड फ्रायडे,११ एप्रिल मा.जोतिबा फुले जयंती,१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,२२ एप्रिल रमजान ईद आणि अक्षय तृतीया आहे. येणारे सण- उत्सव लक्षात घेता पोलीस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. तसेच तळोदा शहरात लहान मुले चोरी करण्याची टोळी सक्रिय असल्याची अफवाही आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक असणे अत्यंत जरुरीचे आहे. अक्षय तृतीयानिमित्त तळोदा शहरात कालिका माता देवी यात्रात्सोव असल्याने यात्रेकरु व भाविकांची तुफान गर्दी असते. दैनंदिन किरकोळ चोऱ्या/भांडण होत असतात.
वरील सर्व धर्मियांचे सण उत्सवांचा जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेसाठी *कणखर कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक* त्वरित नियुक्त करण्यात यावा.