जागतिक आरोग्य दिनापासून सुंदर माझा दवाखाना उपक्रमास सुरुवात
तळोदा दि ५(प्रतिनिधी) सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुंदर माझा दवाखाना उपक्रम राबवण्यात येत असून आरोग्य दिनाच्या निमित्ताने सर्व आरोग्य संस्थांमध्ये जनतेस गुणवत्तापूर्वक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना सर्व संस्थांनी म्हणजेच आरोग्य उपकेंद्रांपर्यंत राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम दिनांक 7 एप्रिलपासून एक आठवडा सुरू राहील .याबाबत आरोग्यसंस्थेकडून स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात येत असून सर्व आरोग्य संस्था स्वच्छ सुंदर दिसाव्यात यासाठी संस्थेची अंतर्बाह्य स्वच्छता ,परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत स्पष्ट नावाचे फलक दर्शनी भागात लावण्यात येणार असून त्याचबरोबर संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवाचे फलक दर्शनी भागात किंवा रुग्णांच्या बसण्याचे जागेत लावण्यात येणार आहेत .आरोग्य संस्थेतील सर्व स्वच्छतागृहे हे प्राधान्याने स्वच्छ करण्यात येणार असून काही किरकोळ दुरुस्ती असल्यास तात्काळ दुरुस्ती करण्यात येणार आहे .आरोग्य संस्थेत बगीचा असल्यास त्याला योग्य प्रकारे कटिंग करून घेण्यात येणार असून कचरा अथवा पालापाचोळा इतरत्र दिसणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे .आरोग्य संस्थेत काही ड्रेनेज संदर्भात काही प्रश्न असल्यास त्याबाबत नियमित व कायमस्वरूपी उपाय योजना तयार करण्यात येणार आहेत. आरोग्य संस्थांची शक्य असल्यास रंगरंगोटी करण्यात येणार असून प्राधान्याने दर्शनी भाग वार्ड यांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रचार प्रसिद्धी स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असून आरोग्य संस्थेत सदर कार्यक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात येईल याची दक्षता घेतली जाणार आहे.
कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अधिकारी भेटी देणार आहेत. कार्यक्रम कालावधी व कार्यक्रमानंतर स्वच्छता निरंतर रहावी यासाठी सर्व संस्थाप्रमुख सतत प्रयत्नशील राहणार असून महिन्याच्या पहिल्या शनिवारी सर्व आरोग्य संस्थेचा कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींच्या सहभागाने श्रमदान करून स्वच्छता दिवस पाळला जाणार आहे. तसेच आर के एस निधी आवश्यकतेनुसार नियमानुसार व मर्यादेत खर्च करण्यात येणार असून स्थानिक एनजीओ यांनी संस्था दत्तक घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी देण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत व उपरोक्त कालावधीत आपल्या आरोग्य सेवा संस्था कार्यक्रम राबवणार असून सदरील कार्यक्रम निरंतर सुरु राहीलयाबाबत सदस्य सदैव प्रयत्नशील राहणार आहेत.