तळोदा दि १७(प्रतिनिधी) समाजात गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते जनतेचे सहकार्य अपेक्षित असते असे प्रतिपादन नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी केले.
तालुक्यातील नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दि १७ रोजी तळोदा येथे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, जिल्हा उपअधिक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, महिला सहायता कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक धनराज निळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांचेसह इतर अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल उपस्थित होते.
गून्हेगारीमूक्त आणि सूरक्षित वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे.नागरीकांनी एखादी घटना घडल्यास पोलिस स्टेशनला यायला घाबरू नये, पोलिस आपणास पूर्ण सहकार्य करतील असे जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील यांनी सांगितले.
प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सर्वसामान्य जनतेशी संवाद साधता यावा,जनता दरबारात तक्रारींचे निवारण करून, पोलिस आणि जनतेत जवळीक निर्माण करणे,भांडणे असलेल्या दोन्ही तक्रारदारांना विश्वासात घेऊन सामोपचाराने प्रकरण निकाली काढण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले.यावेळी कौटुंबिक वाद, मारामारीचे अदखलपात्र गून्हे,शेजा-या -शेजा-यातील भांडणे, पोलिसांविषयी गैरसमज,११६ तक्रारी सोडवण्यात आल्या.कोणाच्या काहीही तक्रारी असतील तर सांगा सर्वांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यासाठी पोलीस मदत करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.तळोदा पोलिसांनी या कार्यक्रमाचे चांगल्याप्रकारे आयोजन केले होते.