Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चांगला कवी होण्यासाठी चांगला माणूस म्हणून जगलो तर आपोआपच साहित्य निर्मिती होते - अ भा मराठी गझल संमेलनाध्यक्ष प्रमोद खराडे

चांगला कवी होण्यासाठी आधी चांगला माणूस असावा
- प्रमोद खराडे 


नंदुरबार,  (प्रतिनिधी) "चांगला गझलकार होण्यासाठी चांगला कवी असणे आवश्यक  आहे आणि चांगला कवी होण्यासाठी चांगला माणूस होणे आवश्यक आहे. चांगला माणूस म्हणून जगू लागलो तर आपोआपच उत्कृष्ट साहित्याची निर्मिती होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष प्रमोद खराडे यांनी केले. या संमेलनात खानदेशातील सहा गझलकार सहभागी झाले होते.
     परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे गझल मंथन साहित्य संस्थेचे पहिले दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. श्री खराडे पुढे म्हणाले की, कवी शोषित असतो. तो मनातले पटकन बोलेलच असे नाही. त्याचा सर्वाधिक संवाद आणि वादही स्वतःशीच चाललेला असतो. तो अगदी उफाळून आले किंवा सोसवेना झाले तरच बोलणार. कवीला एकाच वेळी तीन आघाड्यांवर नेहमीच लढावे लागते. जे जग करत असते ते त्याला करायचे नसते. त्याची ओढ निराळी, त्याची वाट वेगळी त्यामुळे त्याचा स्वतःशीच झगडा सुरू असतो. असेही श्री खराडे यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी स्थानिक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्ताविकात संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन देशमुख उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रशांत वैद्य, दर्शन शहा, डॉ. ज्ञानेश पाटील, अझीझखान पठाण, मारोती मानेमोड, सिद्धार्थ भगत, सुनिती लिमये, प्राजक्ता पटवर्धन आदी उपस्थित होते. सर्व मान्यवर गझलकारांनी गझला सादर केल्या. 
दोन दिवसात झालेल्या एकूण दहा मुशायऱ्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील १५० नामवंत गझलकारांनी आपल्या रचना सादर केल्या. 
डॉ. कैलास गायकवाड यांनी संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद खराडे यांची प्रकट मुलाखत घेतली. तेव्हा गझल विधेला वश करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य द्यावे लागते, असे खराडे म्हणाले. ही मुलाखत नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरली. या संमेलनात खानदेशातील ज्ञानेश पाटील (जळगाव), अनिता खैरनार (शिरपूर), छाया सोनवणे (मेहुणबारे), विष्णू जोंधळे (शहादा), मुकुंदराव जाधव (जळगाव), भरत माळी (नंदुरबार) हे गझलकार सहभागी झाले होते.
संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व गझलकारांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रात्री गझल गायक संकेत नागपूरकर यांची सुश्राव्य मैफिल झाली. निवेदन वैशाली माळी यांनी केले.
गझल मंथन साहित्य संस्थेचे मार्गदर्शक डॉ. कैलास गायकवाड, डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, उर्मिला बांदिवडेकर, निलेश कवडे, रत्नाकर जोशी, गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखडे, उपाध्यक्ष देव कुमार, शाम खामकर, डॉ. राज रणधीर आणि परभणी जिल्हा कमिटीने संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.