हरणखुरीत रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात,३०० पेक्षा अधिक लोकांना मिळाला रोजगार मिळाला.
धडगाव तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायत अंतर्गत हरणखुरी गावात वनविभागाअंतर्गत रोजगार हमी योजनेतुन समतल चर खोदकामाला सुरवात झाली असून यात गावातील ३०० पेक्षा अधिक श्रमिकांना रोजगार मिळाला आहे. प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायत स्तरावरून रोजगार मिळावा यासाठी सातत्याने मागणी केली जात होती.परंतु ऑनलाईन हजेरी आणि मानधनवाढीसाठी रोजगार सेवकांचे राज्यस्तरीय संप, राज्यस्तरीय सहाय्यक कार्यकम अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी यांचे कामकाज बंद आंदोलन, शासकीय निमशासकीय राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन मागणीसाठी आंदोलन आणि आता गटविकास अधिकाऱ्यांचे आंदोलन यामुळे मग्रारोहयो विभागाच्या कामाला ग्रहण लागले होते.
ग्रामपंचायत भुजगावच्या मागणीनुसार वनविभाग परिक्षेत्रात ५ हेक्टर समतलचर खोदकाम सुरु आहे. यांच्या माध्यमातून पाणी संवर्धन,मातीची धूप थांवविण्यास मदत होईल. तालुक्यात पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत असतांना तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. तालुक्यात जलसंधारणाची कामे होणे अपेक्षित आहे परंतु ती आतापर्यंत होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई पुढील काळात आणखी भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसिल अक्राणीचे तहसीलदार किसन गावित, वनविभागाचे वनक्षेत्रपाल सी.ए.काटे,वनपाल एन.डी.पवार, वनरक्षक अनिल पाडवी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दारासिंग पावरा, तांत्रिक सहाय्यक होमा पावरा, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पाडा विकास कमिटीचे अध्यक्ष यांचे सहकार्य लाभत आहे.
“मागील डिसेंबर महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी सुरु होती,अखेर पाच महिन्यानंतर वनविभागाअंतर्गत मग्रारोहयोचे काम मजुरांना मिळाले असून १०० पेक्षा अधिक मजुरांना काम उपलब्ध झाले आहे. पाणी टंचाईची परिस्थिती पाहता जलसंधारणाच्या कामांची मागणी करत आहे मात्र आता दिवस कमी असल्याने अपेक्षित काम होणार नाही.” अर्जुन पावरा,लोकनियुक्त सरपंच,ग्रामपंचायत भुजगाव.
“ मे महिन्याला काम उपलब्ध झाल्याने कडकडीत ऊन असूनही १०० पेक्षा अधिक मजूर कामावर येत आहे, नेटवर्क कमी असल्याने मजुरांची ऑनलाईन हजेरी भरणे अडचणीचे होते. त्यामुळे धडगाव बाजारात जाऊन डाटा उपलोड करावे लागत आहे. ग्रामपंचायत, तहसील रोहयो विभाग आणी वनविभागाचे सहकार्य मिळत असल्याने कामे सुरळीत सुरु आहे.” सुभाष पावरा, ग्रामरोजगार सेवक,हरणखुरी