बारमाही रस्ते देण्यासोबतच दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणण्याची योजना राबवणार : संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांची ग्वाही
नंदुरबार - तोरणमाळ पासून खालच्या भागातील गाव पाडे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ते वीज पाणी आणि अन्य सुविधांपासून वंचित राहिले. ही मोठी दुरावस्था आहे. परंतु ही सर्व स्थिती पालटण्यासाठीच मी खासदार बनले असून भादल गावासह नर्मदा काठच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना राबवली जाईल, बारमाही पक्के रस्ते देण्याबरोबरच या भागात वीज खांब देऊ तसेच येथील कुडाच्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे दिली जातील; अशी ग्वाही संसद रत्न खासदार डॉक्टर हिना ताई गावित यांनी दिली.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला नर्मदा काठावर असलेल्या भादल या गावात श्री शंकर आदिवासी विकास बहुउद्देशिय संस्था, धनाजे बु., ता.धडगांव आणि श्वेता रूरल फाऊंडेशन, धडगांव यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "एकच ध्यास सामाजिक विकास" कार्यक्रमांतर्गत संसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी हे भाषण केले.
प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरा पाडवी, जिल्हा परिषद सदस्या सौ. निलीमा सुभाष पावरा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकर पावरा, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे, सौ. सुरेखा लतेश मोरे, एडवोकेट जयश्री गावित, ॠषा गावित, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पराडके, नंदुरबार येथील भाजपाचे संतोष वसईकर, माजी गटनेते आनंदआण्णा माळी, मांगूभाऊ माळी, भादल ग्रामपंचायत सरपंच बुरकाताई पावरा, सिंधी दिगरचे सरपंच संदीप पावरा, झापी चे सरपंच जयराम पावरा, उडद्याचे सरपंच शिवा पावरा, भाबरीचे सायमल पावरा, आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाय योजना आणि विकास योजना याविषयी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सविस्तर माहिती याप्रसंगी, दिली. घरकुल योजना, हर घर जल योजना, आनंद शिधा, शेळी व गाय वाटप योजना यासह विविध योजनांचा लाभ घ्यायला आदिवासी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी सुभाष पावरा यांनी आपल्या भाषणातून केले तर शिवाजी पराडके यांनी भारतीय जनता पार्टी जनजातींच्या विकासासाठी करीत असलेल्या कार्याची मांडणी आपल्या भाषणातून केली.