जनता दरबाराचे आयोजन तहसील कार्यालय सभागृहात प्रथमच विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात घेण्यात आला, सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी आमदार आमशा पाडवी,जिल्हा उपप्रमुख के. टी. गावीत,तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, दिलीप कुलकर्णी, शिवसेना जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे, युवासेना जिल्हा संघटक अरुण गावित, नंदुरबार तालुकाप्रमुख विजय ठाकरे, तालुका उपप्रमुख प्रवीण ब्राहो, माजी शहरप्रमुख गोविंद मोरे,युवासेना शहरप्रमुख राहुल टिभे, रवि सोनवणे हिरामण पाडवी यांच्यासह पदधिकारी उपस्थित होते.
जनता दरबारात नवापूर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदार पाडवी यांच्यापुढे मांडला. यात वीज वितरण कंपनी, नवापूर नगरपरिषद, वनविभाग, सार्वजिक बांधकाम विभाग, पंचायत समिती बांधकाम विभाग, घरकूल योजना, कृषि विभाग, नॅशनल हायवे ६ चे सुरू असलेले चौपदरीकरण,एमआयडीसीच्या जमिनी व रस्त्यासंदर्भातील समस्या नागरिकांनी मांडल्या, या समस्या ऐकून घेत आमदार पाडवी यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना तहसीलदार महेश पवार यांना केल्या.
प्रसंगी आमदार आमशा पाडवी यांनी, हा जनता दरबार नवापूर तालुक्यात प्रथमच मी घेत आहे. नंदुरबार जिल्ह्यात हा माझा तिसरा जनता दरबार आहे. परत तीन महिन्यांनी नवापूर तालुक्यातील सुटलेल्या समस्यांचा आढावा घेणार आहे. सर्व अधिकाऱ्यांनी जनता दरबारात नागरिकांनी ज्या समस्या मांडल्या आहेत त्याचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा सूचना केल्या. नवापूर तालुक्यातील काही
विभाग वगळता सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नवापूर तालुक्यातील अनेक नागरिक व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बोरसे यांनी केले.