शहादा दि ३०(प्रतिनिधी) तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,उपाध्यक्ष गणेश खर्डे,वडगाव गाव अध्यक्ष राहूल चव्हाण, आकाश तडवी,सोमनाथ सुळे,दिवान पावरा,दिलीप वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात तासिका (CHB) तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या जात असतात. तासिका तत्वावर भरलेले प्राध्यापक हे शैक्षणिक पात्रता पूर्ण असतांना त्यांना दरमहा वेठबिगारी सारखा तूटपंज्या पगार दिला जातो. जर सदर प्राध्यापक पात्र आहेत, तर त्यांचा तासिका तत्वावरील अनुभव ग्राह्य धरून भविष्यात पूर्ण वेळ जागा निघाली तर,अशा अनुभवी प्राध्यापकांना प्राधान्य देण्यात यावे,तशी तरतूद करण्यात यावी.
त्याचबरोबर पूर्वी CHB भरती संवर्ग निहाय होती मात्र, महाराष्ट्र सरकारने सन २०२२-२३ मध्ये नवीन परिपत्रक काढून आरक्षण संपवले आहे. आता आरक्षण असून खुला मध्ये आरक्षित उमेदवाराला स्पर्धा करावी लागते. त्याचा परिणाम असा होतो की, मागासवर्गीय प्राध्यापक डावलेले जात आहेत. म्हणून पूर्वीप्रमाणे बिंदूनामावलीनुसार तासिका तत्त्वावरील प्राध्यापक भरण्यात यावेत. सर्वात जास्त अन्यायकारक व कामगार कायद्याचे उल्लंघन करत प्राध्यापकांना नियुक्ती ९ महिन्याची दिली जाते, मात्र मानधन फक्त ५ ते ६ महिन्याचे दिले जाते. आणि तेही तटपुंज्य दिले जाते. व आमच्याकडून पूर्ण ९ महिन्यासाठी काम करवून घेतले जाते. तरी आमची नेमणूक ही ११ महिन्यासाठी करण्यात यावी. व दर महिन्याला मानधन ५०,००० हजार रुपये देण्यात यावे. सदर प्रश्न हा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या निदर्शनास आणून तात्काळ मार्गी लावण्यात यावे,हीच नम्र विनंती,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाला देण्यात आलेला आहे.