३५० वा शिवराज्याभिषेक वर्षेपुर्तीनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ३५० गड किल्ल्यांवर ध्वज मोहीम हाती घेण्यात आली होती.
३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने सार्वभौम हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यावेळी स्वराज्याचे सर्वात महत्वाचे शिलेदार होते, किल्ले. त्यांच्या भक्कम पाठबळावरच स्वराज्य निर्माण झाले.
हे वर्ष ३५०वे शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हे वर्ष साजरे करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी, राज्यातील दुर्गप्रेमी, शिवप्रेमी व्यक्ती व संस्था महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा व भगवा ध्वज फडक्यात आले. २६ जानेवारीला भारत प्रजासत्ताक होऊन सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले. त्याचे औचित्य साधत हा उपक्रम प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला आहे.
गडकोट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, असंख्य मावळ्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे, पराक्रमाचे प्रतिक आहेत. त्यामुळे गडकोट हे स्फूर्तीस्थाने आहेत, प्रेरणा स्त्रोत आहेत, हे या उपक्रमा द्वारे अधोरेखित करण्याचा उद्देश होता. या उपक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज, गडकोट, स्वराज्यातील सरदार व मावळे यांना मानवंदना देण्यात आली आहे.
महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी यांना अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्यामुळे शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला..!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्ष पूर्ण झाली. त्याची आठवण म्हणून आज ३५० गड-किल्ल्यांवर कार्यक्रम साजरे केले गेले. शाळेतील विद्यार्थी आणि शिवप्रेमी , गडकोट किल्ले प्रेमी, निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.या उपक्रमात दहा हजारांहून अधिक शिवप्रेमींनी सहभाग घेतला.महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे,रूषीकेश यादव, डॉ राहूल वारंगे, राहुल मेश्राम, दिपाली भोसले यांनी योगदान दिले.
हा कार्यक्रम सकाळी १० ते ११.३० या एकाच वेळेत सर्व ३५० किल्ल्यांवर साजरा झाला हे विशेष.
तसंच यावेळी सर्वांनी गड-किल्ले स्वच्छ ठेवण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची, त्यांचा इतिहास समजून घेण्याची शपथ घेतली.
अशी शिव-प्रतिज्ञा घेण्यात आली....
शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या या पवित्र गड कोट किल्ल्यावर शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अशी शपथ घेते/घेतो की...
गडकिल्ल्यांचे पावित्र्य मी सांभाळेन.किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा मी टाकणार नाही/टाकू देणार नाही.
गडावरील तट, बुरुज व इतर वास्तू यांना धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेईन.
किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करेन आणि त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
गड-किल्ल्यांची भटकंती करताना स्वराज्याचा सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि तो वारसा अभिमानाने जपेन आणि जगेन.
छत्रपती शिवाजी महाराज की जय !