धडगाव दि ११ धडगाव तालुक्यातील पाणी टंचाई गाव निमझरी, दिवडपाणी, खर्डी बुद्रुक येथे व्हेल्स ऑन व्हील्स चे संस्थापक अध्यक्ष श्री. शहाज मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने निमझरी, दिवडपाणी, खर्डी बुद्रुक येथील वस्तीवर १५३ कुटूंबाना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले.
निमझरी, दिवडपाणी, खर्डी बुद्रुक या गावांना नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती. सर्व वस्तीला एकत्र करुन गावाची समस्या जाणून घेतल्या. गावाची पाहणी करुन गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले. मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये, गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी, डोक्यावरचा हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन संस्था आदिवासी पाड्यांवर मोफत ड्रम वाटपाचे काम करते. पाणी वाहण्याच्या कामासाठी शाळकरी मुलींचा बराचसा वेळ जात असतो, तसेच बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात. यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकतं नाही. ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून निमझरी, दिवडपाणी, खर्डी बुद्रुक या गावांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले. यामुळे घरातील इतर व्यक्ती पाणी आणण्यासाठी जातील. गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल. परिणामी मुलींना पाणी वाहण्याच्या कामापासून सुटका मिळेल. मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील. ड्रम वाटप वेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले, विजय देवरे, स्वप्निल पाटील, संकेत बिडगर, रोशन भांगरे, समाजिक कार्यकर्ता प्रितेश पावरा त्यांचे सहकारी दिपक पावरा तसेच गावातील नागरिक उपस्थित होते, यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मितहास्य होते. व्हेल्स ऑन व्हील्स संस्थेचे तसेच समाजिक कार्यकर्ते प्रितेश पावरा ह्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. अश्या पद्धतीत मोठया उत्साहात कार्यक्रम पार पडला.