*त्यांचा नजाकतीने वापर करा*
*- डॉ. ज्ञानेश पाटील*
नंदुरबार, दि ११ (प्रतिनिधी) ज्या वेळेस खरोखरच तुम्हाला लिहावेसे वाटेल तेव्हाच लिहा.. अजिबात घाई करू नका.. ज्यावेळेस लिहिणार त्यावेळेस प्रामाणिकपणे लिहा.. शब्दांचा भडिमार नसावा. आपल्याकडे शब्दांच्या रूपाने खूप मोठे भांडवल आहे. संत तुकाराम महाराजांनी शब्दांना रत्न आणि शस्त्र असे दोन रुपे दिली आहेत. दोन्ही जपून वापरायचे असतात. त्यांना काळजीपूर्वक आणि नजाकतीने वापरावी लागतात. असे प्रतिपादन गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील यांनी जळगाव येथे आयोजित खान्देश विभागीय गझल संमेलनात केले.
जळगाव येथे गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन घेण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. ज्ञानेश पाटील बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन गझलकार डॉ. शिवाजी काळे यांच्या हस्ते झाले. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष गझलकार निलेश कवडे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, साहित्य क्षेत्रातले आतापर्यंतचे स्वतंत्र असे पहिले अॅप संस्थेने आणले. वर्षभरात ११ एकदिवसीय गझल संमेलने होणार आहेत. या संमेलनातून सुमारे सातशे गझलकारांना संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी मराठी गझल वैश्विक करूया. गझलच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राचे पूजन करून सेवा करूया असे आवाहन त्यांनी केले.
गझलकार निलेश कवडे यांनी संस्थेचे पदाधिकारी आधी स्वतः शिकले आणि इतरांना व्यासपीठ निर्माण करून दिले. असे गौरवोद्गार काढून संस्थेचे स्फूर्ती गीत सादर केले. उद्घाटक डॉ. शिवाजी काळे यांनी 'गझलेचे गारूड' तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम गझल मंथन करीत असल्याचे सांगितले. गझलकार संदीप वाकोडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, एका काळजातून उसळते आणि दुसऱ्या काळजावर कोसळते असे गझलेबद्दल बोलले जाते. गझल मुशायरे घेण्यासाठी खूप आर्थिक कसरत करावी लागते. साहित्यिक कार्यक्रमांचा समाजाला फायदा काय? यावर बोलताना ते म्हणाले की, या माध्यमातून माणूस बनविण्याचे कार्य होत असते. माणसाला संवेदनशील बनविण्याचे कार्य होत असते. माणसाला स्वतःवर नियंत्रित ठेवण्याचे कार्य होत असते. समाजाला वास्तवाचे चित्र दाखविण्याचे कार्य होत असते. आणि हा समाज नियंत्रित करण्याचे कार्य होत असते. आणि हे कार्य समाजहिताचे असतात. मानवहिताचे असतात. माणुसकी जपणारे असतात. असे सांगितले.
यावेळी गझल मंथनचे खान्देश उपविभाग प्रमुख अॅड. मुकुंदराव जाधव यांचा 'फुलला सुगंध प्रेमाचा' या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मार्गदर्शक उर्मिला बांदिवडेकर म्हणाल्या की, गझल मंथनच्या कार्यशाळांमुळे महिला गझलकारांची संख्या वाढली असल्याचे सांगून यांनी आतापर्यंत घेतलेल्या सर्व गझल कार्यशाळा व त्यातील विद्यार्थी यांचा आढावा घेतला. याप्रसंगी धुळे जिल्हाध्यक्षा अनिता खैरनार यांचा गझलयात्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या संमेलनात निमंत्रित गझलकारांचे दोन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गझलकारांचे चार असे एकूण सहा मराठी गझल मुशायरे झाले. सगळेच मुशायरे बहारदार झाले. संमेलनाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन खान्देश विभाग प्रमुख काशिनाथ गवळी यांनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा कार्यकारिणी आणि खान्देश विभागीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.