दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १६ जणांना अटक!
सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि २२
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल(२१ मार्च) रात्री उशिरा ईडीने अटक केली.दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर काल त्यांना ईडीने ताब्यात घेतले.दरम्यान, या प्रकरणात केजरीवाल यांच्यासह आतापर्यंत ईडीने १६ जणांना अटक केली आहे.
ईडीने १५ मार्च रोजी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी राव यांची कन्या के कविता यांना हैद्राबाद येथून अटक केली होती.बीआरएस नेत्या के कविता यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे.दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने मनीष सिसोदिया आंणि संजय सिंह याना यापूर्वीच अटक केली आहे.पीएमएलएच्या कलम-३ आणि कलम-४ अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
दि २१ रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात नऊवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते. अखेर गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे आपकडून सांगण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. हे एक राजकीय षडयंत्र आहे. दिल्लीचे मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल हेच राहतील. त्यांना तुरुंगात सरकार चालवावे लागले तरी हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल हेच राहतील. ईडीकडून अनेक धाडी टाकण्यात आल्या मात्र, त्यातून एक रुपयाही त्यांना मिळाला नाही. आज लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अटक करण्यात आली. हे एक षडयंत्र आहे. अरविंद केजरीवाल माणूस नाहीत, ते एक विचार आहेत, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्या आतिशी यांनी व्यक्त केली आहे.