तळोदा दि ६ (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता भंग करत निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता पक्ष कार्यालय सुरू ठेवल्याबद्दल तळोदा येथील भाजप आमदार कार्यालय व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. पालिका मुख्याधिकारी अंजनी शर्मा यांनी ही कारवाई केली.
लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना सर्व राजकीय पक्षांना देण्यात आल्या आहेत. या सूचनानंतरही
तळोदा शहरात नगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलात आमदार कार्यालय सुरू आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता हे कार्यालय सुरू ठेवल्याबद्दल भाजपच्या नावाने नगरपालिकेने कार्यालयाला नोटीस बजावली.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या संपर्क कार्यालयालाही नोटीस बजावण्यात आली आहे. दोन्ही राजकीय पक्षांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये कार्यालयासंबंधी विहित प्रक्रिया पार पाडल्याविना ताब्यात घेतल्याचे आढळले.
आदर्श आचारसंहितेचे पालन होणेकामी कार्यालयाचा वापर करणेसाठी विहित प्रक्रियेचा अवलंब करेपर्यंत मालमत्ता २४ तासाच्या आत पालिकेकडे हस्तांतरीत करणेत यावी, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.