नंदुरबार दि १९(प्रतिनिधी)विज्ञान, तंत्रज्ञान, आणि सृजनशीलतेचा संगम असलेल्या हॅकेथॉन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 344 शाळा पैकी निवडक 100 शाळांचे जिल्हास्तर प्रदर्शन श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथे दि. १७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना वळवी, डायटचे अधिव्याख्याता श्री सुभाष वसावे, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब बडे आणि श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्य श्रीमती सुषमा शाह हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब बडे म्हणाले की,
हॅकेथॉन हा उपक्रम म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर नवकल्पना, समस्या सोडविण्याची क्षमता, आणि संघभावनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
मनोगत व्यक्त करताना शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना वळवी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पनाशक्ती आणि कौशल्ये वापरून तयार केलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण आज आपण येथे अनुभवणार आहोत.
तर डॉ. राजेंद्र महाजन उद्घाटन पर अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, आणि सर्जनशीलतेचा विकास होतो.आजच्या या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, आपल्या जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण नवसंशोधनाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आणि त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी प्रेरणा देणे हा आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील हॅकेथॉन उपक्रमांतर्गत शाळांची नोंदणी वाढवण्यासाठी प्राचार्य डॉ. भारती बेलन यांच्यासह व सर्व गटशिक्षणाधिकारी आणि डायट चे अधिकारी यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची नोंदणी राज्यात आठव्या क्रमांकावर सर्वाधिक होती.
या जिल्हास्तरीय प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार, श्री. प्रदीप पाटील, श्री. विनोद लवांडे, यजुवेंद्र देवरे, महेंद्र बारी यांच्यासह गोविंद वाडीले, विनोद चव्हाण, रावसाहेब पाटील भरत पाटील, श्री. निकम यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन श्रॉफ हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती चेतना पाटील यांनी केले. जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून श्री अनंतकुमार बोरसे, श्री अनंतकुमार सूर्यवंशी, श्री प्रवीण शिंदे, श्री प्रवीण पाटील, श्री दिनेश पाटील, श्री सुरेश जगदाळे, श्री अनिल माळी व श्री अनिल सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळा अशा तीन गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली.
गट १. शासकीय शाळा
*प्रथम क्रमांक* - शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, शहाणा, ता. शहादा - *सेंद्रिय शेती*
*द्वितीय क्रमांक*- कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, विद्याविहार, ता. शहादा - *चुंबकाच्या साह्याने भूमिती*
*तृतीय क्रमांक*- कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, विद्याविहार, शहादा - *स्पेलिंग बॉक्स*
गट 2. शासकीय अनुदानित शाळा
*प्रथम क्रमांक* - अनुदानित आश्रमशाळा, भरडू, ता. नवापूर *आरोग्य बहुउपयोगी स्टूल*
*द्वितीय क्रमांक* - श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार *आधुनिक पोळपाट लाटणे*
*तृतीय क्रमांक* - श्रीमती पुतळाबाई पाटील माध्यमिक विद्यालय, वैंदाणे, ता. नंदुरबार *एसी व्हेजिटेबल स्टॉल*
3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
*प्रथम क्रमांक* - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुने धडगाव, ता. धडगाव *वाहतूक व दळणवळण*
*द्वितीय क्रमांक* - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरवड, ता. तळोदा *वाहतूक व दळणवळण*
*तृतीय क्रमांक* - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अस्तंबा, ता. धडगाव *अन्न आणि पोषण*