Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत सत्कार समारंभनंदुरबार जिल्हा परिषदेचा उपक्रम

नंदुरबार दि १७ (प्रतिनिधी) सन २०२४-२५ मध्ये नंदुरबार जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंतर्गत अध्ययन- अध्यापन नियोजन व नियतकालिक मूल्यांकन (रूटीन कार्यक्रम) या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीत दिलेल्या सातत्यपूर्ण सक्रिय योगदानाबद्दल शिक्षकांचा सत्कार आणि भविष्यवेधी नियोजन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, प्राचार्य डायट डॉ. राजेंद्र महाजन, डायट च्या माजी प्राचार्य डॉ.भारती बेलन, अधिव्याख्याता डॉ.बाबासाहेब बडे, डॉ. वनमाला पवार, सर्व गटशिक्षणाधिकारी, समन्वयक विस्तार अधिकारी उपस्थित होते.
         नंदुरबार जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात अध्ययन अध्यापनात विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार बदल केला जातो. शिक्षण विभागातर्फे सातत्याने विद्यार्थी केंद्रीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या चिंतनाने नंदुरबार जिल्ह्यात रूटीन उपक्रम राबविण्यात आला.
         योग्य वेळी चिंतन झाल्यास भविष्यात चिंता करण्याची वेळ येत नाही,म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास फक्त कागदावर होऊ नये,तर तो विद्यार्थ्यांच्या काळजावर व्हावा, यासाठी सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून हा उपक्रम राबविण्यात आला.
वर्षभर या उपक्रमाची अंमलबजावणी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आली. उपक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर दरमहा अध्ययन- अध्यापन नियोजन यासह अध्ययन निष्पत्ती नुसार पूरक उपक्रम आणि कृती तसेच अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन असे सर्वंकष मासिक नियोजन देण्यात आले.
त्यानंतर चाचणी घेणे यानुसार एकूण ६ चाचण्या शाळांवर घेण्यात आल्या.
शैक्षणिक वर्ष अखेर उपक्रमाची यशस्विता तपासण्यासाठी भरारी पथक व बैठे पथक तयार करून गोपनीय पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरित करून चाचणी घेण्यात आली. त्यात गुणवत्तेत सुमारे १२% ने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या उपक्रमाशिवाय पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी कार्यशाळेत चर्चा करून जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एक महिन्यात उपक्रम निश्चिती व अंमलबजावणी ची दिशा निश्चित केली जाणार आहे. यावेळी रूटीन उपक्रम तयार करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी अधिव्याख्याता बाबासाहेब बडे आणि उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी कामकाज पाहिले.