Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी बैठक — संघटनेचा निर्धार, महिलांचा संकल्प, नागपूर सज्जतेकडे!

नागपूर दि १६ (प्रतिनिधी) संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर येथे मुख्य संयोजक ईश्वर धिरडे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली.
या बैठकीस प्रमुख पदाधिकारी, नामवंत सामाजिक कार्यकर्ते, तसेच समर्पित महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाच्या अनुषंगाने विविध समित्यांवर नियुक्त्या, कार्यविभाग, नियोजन आणि संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भातील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. संपूर्ण संमेलनाचा प्रचार व प्रसार व्यापक स्तरावर व्हावा यासाठी प्रभावी माध्यमांचा वापर करून विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संमेलनाच्या आयोजनासाठी पूर्ण मनःपूर्वक सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषतः महिला प्रतिनिधींनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि एकजुटीने संमेलनाच्या यशासाठी सज्ज असल्याचे सांगितले. “आम्ही नागपूरातील सर्व महिला एक आहोत, मतभेद विसरून, नामदेव महाराजांच्या विचारांसाठी एकत्र आलो आहोत आणि झोकून देऊन काम करणार आहोत,” असा ठाम संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“आम्हाला दिलेली जबाबदारी ही केवळ कामगिरी नव्हे तर ती एक पवित्र सेवा समजून आम्ही ती पार पाडू,” असेही महिला मंडळींनी स्पष्ट सांगितले. पुरुष पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्साहाने आपली मते मांडत संमेलनाच्या प्रत्येक टप्प्यावर कटिबद्धतेने योगदान देण्याची ग्वाही दिली.

या बैठकीत ‘नागपूर एक आहे, आणि नागपूर एक राहील’ या भावना अनेक वक्त्यांनी अधोरेखित केली. संत नामदेव महाराजांचे विचार केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न राहता, ते सामाजिक ऐक्य, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे आहेत. हे महासंमेलन त्या विचारांना जनमानसात पोहोचवण्याचा आणि अखंड भारताला एकतेच्या सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आहे.

या बैठकीतून एक गोष्ट स्पष्ट झाली – नागपूर शहराच्या हृदयात हे संमेलन आधीच स्पंदू लागले आहे. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक कार्यकर्ता आणि महिला भगिनींनी एकत्र येऊन हे महासंमेलन ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि यशस्वी करणार हे निश्चित झाले आहे.