दहावीत जी.डी.आर. कन्या हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते तर बारावीत न्यू हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. पुढे घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आणि बारावीनंतरच माझं लग्न झालं; पण तरीही मी शिक्षण चालू ठेवलं. माझ्या पतीनेही शिक्षणात नेहमी प्रोत्साहित केले. दहावी-बारावीमध्येच मला हिंदी विषयाची आवड निर्माण झाली. हिंदी शिक्षकांचे शिकवणं मला अतिशय आकर्षक वाटायचं, त्यामुळे मी हिंदी विषयात बी ए पदवी आणि एम ए चे पदव्युत्तर यश संपादन केले.
यानंतर, बीएडमध्ये प्रवेश घेतला आणि फक्त नऊ महिन्यांत बीएड पूर्ण करून मी शिक्षकत्वाकडे वाटचाल केली. पुढे काय करावं याचा विचार मनात घोळत असताना त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाने शिकवण्याची संधी दिली, तेव्हा मी तत्काळ त्या कॉलेजमध्ये रुजू झाली.
वर्ष २०१७ मध्ये कॉलेजमध्ये रूजू झाल्यावर मला समजले की सीनियर कॉलेजमध्ये नोकरीसाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. या कठीण परीक्षेबद्दल आधी काहीच माहिती नव्हती, पण "थेंबे थेंबे तळे साचे"या म्हणी प्रमाणे सातत्याने अभ्यास सुरू केला. मात्र, मुलं लहान असल्याने अभ्यास काही काळ थांबला. नंतर अश्विनीताई, चेतनाताई आणि आरजू यांच्या प्रेरणेने मी पुनः अभ्यासाला लागले. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि सातत्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मी प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत आपले यशस्वी पाऊल उभं केलं.
या शिक्षण प्रवासात माझ्या सासूबाईंनी सर्वाधिक साथ दिली. मी शिकत असताना माझ्या मुलांची काळजी त्यांनी घेतली आणि घरातील प्रत्येक कामात मदत केली. त्यामुळेच मी या यशाचा उंच शिखर गाठू शकले. याशिवाय माझ्या पतीने, मुलांनी, आई-वडिलांनी आणि भावाने देखील सदैव पाठिंबा दिला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्यादेवी तांबोळी, मार्गदर्शक अशोक तांबोळी, त्रिमूर्ती महिला महाविद्यालयातील प्राचार्या वैशाली पाठक, आरजू पिंजारी, चेतना माळी , अश्विनी माळी, ममता पाडवी, रुचिता राणे , भूषण बाविस्कर यांचाही मला अतिशय आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभल्या. कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील प्रा.डॉ.एस एन शर्मा आणि सर्व प्राध्यापकांनी ही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएचडी पात्र ठरल्याचा मला अभिमान आहे. पीएचडी साठी प्रा.डॉ. शर्मा सर माझे मार्गदर्शक आहेत.या यशाचे श्रेय मी प्रथम माझ्या सासूबाईंना देते, ज्यांच्या मोलाच्या साथीत मी इथपर्यंत पोहोचले आहे.