नंदुरबार दि ४(प्रतिनिधी) श्री स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर येथील सन १९९३-९४ मधील बी. एड. च्या बॅच मधील विद्यार्थ्यांचे स्नेहमिलनाचे आयोजन नंदुरबार येथील इटारसी पार्क नळवा रोड येथे करण्यात आले होते. तब्बल ३२ वर्षानंतर मित्रांचा गोतावळा जमल्याने साऱ्यांनी बी. एड. मधील वर्षभराच्या सूक्ष्मपाठ, सेतुपाठ, सरावपाठ, सांस्कृतिक कार्यक्रम यातून 'मी कसा घडलो' या सारख्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सन्माननीय प्राचार्य डॉ. नलिनी पाटील, डॉ. लता गुप्ते, डॉ. सुनील भामरे, डॉ. संजय अहिरे, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. अजय साळी व डॉ. रत्नप्रभा चव्हाण या गुरुवर्याचे ऋण व्यक्त करताना अनेकांना गहिवरून आले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तत्कालीन १३० विद्यार्थ्यांच्या बॅचमधील सर्व विद्यार्थी महाराष्ट्रभर विविध विभागात उच्च पदस्थ अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, व शिक्षक म्हणून कार्यरत आहेत या सर्व विद्यार्थ्यांची मुले मुली उच्चशिक्षित असून देश विदेशात गले लठ्ठ पगाराची नोकरी व व्यवसाय करीत आहेत. याचा सर्व गुरुवर्य व मित्रांना मनापासून आनंद झाला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरलेल्या सर्व मित्रांनी एकत्र येण्याचा मनोदय व्यक्त केला. अनेक अडचणीतून मार्ग काढल नंदुरबार येथील 'इटारसी पार्क' ठिकाण निश्चित झाले. स्थानिक स्नेह मेळावा समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. संजय शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार सावळे, डॉ. पुरुषोत्तम विसपुते, श्री. कैलास वळवी व श्री. काशिनाथ माळी यांनी पुढाकार घेऊन आपल्या मित्रांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून तन मन व धनाने प्रयत्न करून 'स्नेहमेळावा' यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
कार्यक्रमस्थळी दिवसभर गमती जमती, शालेय अनुभव सोबतच गेल्या 32 वर्षातील जीवनातील घडामोडींना उजाळा दिला यावेळी प्रत्येकाने आपल्या कार्याचा परिचय व मनोगत व्यक्त केले दरम्यान अनेकांना गहिवरून आले अनेक वर्षानंतर भेटलेल्या मित्रांमध्ये शेकडा ९९% वर्गमित्र हे शिक्षण व्यवसायामध्ये उच्च पदस्थ अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, संस्थाचालक, पर्यवेक्षक, उपशिक्षक पदोन्नती प्राप्त व विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित वर्गमित्र भेटल्याने दैनंदिन ताणतणाव विसरले. दिवस संपू नये, असे वाटत असताना समारोपप्रसंगी यापुढे दरवर्षी सहपरिवार एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान येथे स्नेह मेळावा आयोजित करण्याचे श्याम साळुंखे यांनी आश्वासित केले