भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्त्वाचा आहे.अनेक आदिवासी क्रांतिवीरांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली.तंट्या मामा भिल,धरतीआबा बिरसा मुंडा,भीमा नायक,क्रांतिवीर खाज्या नाईक,राघोजी भांगरे,राणी दुर्गावती मडावी,झलकारीबाई,हल्दीबाई भिल,राणा पुजा भिल,वीर बापू शेडमाके,नारायण सिंह उईके,स्वातंत्र्यसेनानी श्याम दादा कोलम असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले.मात्र,प्रस्थापित इतिहासकारांनी आदिवासी क्रांतिकारक,त्यांच्या इतिहास,उठाव,लढे यावर पाहिजे तेवढे लिहिले नाही हे दुर्दैव.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झंझावत क्रांतिसूर्य,एक सोनेरी पान म्हणजे धरतीआबा बिरसा मुंडा.त्याचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा व आईचे नाव करमी मुंडा होते.बिरसा मुंडा लहानपणापासून हुशार व बुद्धिमान,धैर्य,स्वाभिमान,शूरपणा व अधिकाराची जाणीव हे गुण त्यांच्यात होते.बासरी वाजविणे,रानात जाऊन धनुर्विद्या व नेमबाजीच्या सराव करायचे.
बिरसा मुंडाची आंदोलने हे मानव मुक्तीसाठी होते.आदिवासींवरील होणारे अन्याय,अत्याचार,शोषण करणारे प्रस्थापित जमीनदार सावकार व ब्रिटिशाविरुद्ध होती.इ.स.१७८९ ते १८३२ चा दरम्यान आदिवासींनी अनेक विद्रोही आंदोलने केली.यातील जास्त प्रभावी विद्रोह म्हणजे १८३२-३३ च्या 'कोल विद्रोह'पूर्वीपासून छोटा नागपूर आणि सिंहभूमी हा प्रदेश समृद्ध होता.येथील डोंगरदऱ्यात मुबलक वनसंपदा,खनिजसंपत्ती होती.आदिवासींची वडिलोपार्जित शेतजमीन छोटा नागपूरचे राजा यांचे लहान भाऊ हरनाथ सहाई याने बऱ्याच गावातील शेती प्रस्थापित जमीनदार,सावकार आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिली.आणि या प्रदेशातील भूमीच्या मूळ मालकांना बेदखल केले.कधीच मान सन्मानाने जगू दिले नाही.सहाजिकच,आदिवासींचा सावकार,जमीनदार व परप्रांतीय ब्रिटिश व्यापाराबद्दल असंतोष वाढला.विद्रोहाची आग गावागावात गेली.सर्व परप्रांतीयांना छोटा नागपूर भागातून हुसकावून लावले.या विद्रोह आंदोलनात हजारों आदिवासी सहभागी झाले होते.
बिरसा मुंडा आदिवासींच्या न्याय हक्कासाठी,अन्याय, अत्याचाराविरुद्ध व जल,जंगल, संपत्तीसाठी अखंड लढा देत राहिले.गावागावात जाऊन शोषित,पीडित लोकांना जनजागृती करून ज्योत जागवली.ते जंगलात जे मिळेल ते खाऊन जनजागृती करीत होते.एक वैचारिक जनजागृती केली.बिरसा मुंडाने इंग्रज,जमीनदार, सावकार यांच्याविरुद्ध *'उलगुलान'* सुरू केले.नोव्हेंबर १८९८ मध्ये डोमसारी येथे सभा बोलवून सरदार आंदोलनातील कार्यकर्त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढण्याचे ठरविले.बिरसा मुंडांनी दोन झेंडे तयार केले होते.एक पांढरा,दुसरा लाल.पांढरा झेंडा मुंडांच्या, शुद्धतेच्या,निर्मळतेच्या प्रतीक होता.तर लाल झेंडा आदिवासींच्या शोषण,अन्याय,अत्याचार करणाऱ्याविरुद्धच्या प्रतिक होता. ठिकठिकाणी सभा घेऊन लोकांना संघटित केले.बिरसा मुंडा आपल्या भाषणात म्हणत असे,भिऊन व घरात लपून काय होणार नाही.आम्हाला जल,जंगल,संपत्ती पासून दूर करतात.आमच्या दारिद्र्याच्या फायदा घेऊन आपल्या जमिनीवर कब्जा करतात.हे कुठंपर्यंत सहन करायचे?आपले जल,जंगल,संपत्ती वाचवण्यासाठी व होणारे अन्याय,शोषण,अत्याचार करणारे सावकार,जमीनदार, ब्रिटिशाविरुद्ध एक जुटीने लढा. नाहीतर,मूळ मालकांचे हक्क, अधिकार,अस्तित्व नष्ट होऊन आमच्या वंश समूळ नष्ट होईल.येणाऱ्या भावी काळात फक्त एखाद्या पुस्तकात छोटा नागपूरच्या प्रदेशात मुंडा जमाती राहत होती.एवढेच वर्णन राहील.१८९४ मध्ये दुष्काळ दरम्यान त्यांनी लोकांसाठी कर माफ करण्याचा मागणीसाठी आंदोलन केले.२५ डिसेंबरपासून बिरसा मुंडांनी 'मुक्ती' आंदोलनाला सुरुवात केली.डिसेंबर १८९९ च्या रात्री रांची पासून चाईबासापर्यंतच्या ४०० चौ.मेलाच्या विस्तीर्ण भागात ठिकठिकाणी पोलीस चौक्या,इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरावर अंधारात धनुष्यबाणाच्या जोरदार वर्षाव केला.त्यावेळी रांची शहरात चार दिवस अघोषित संचारबंदी होती. सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर ठाणे आणि रांची जिल्ह्यातील खुंटी, करी,तोरण,तमाड आणि बसिया ठाण्याच्या परिसरात बंडाची जोरदार ठिणगी पडली.खुंटी ठाण्याच्या परिसर या आंदोलनाचे केंद्र होते.त्यांच्या विद्रोहामध्ये विचारधारेच्या प्रभाव होता.त्यांच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपूर क्षेत्रात जमीन सुधारणा विषय कायदे केले व आदिवासींची जमिनी गैरआदिवासींनी विकण्यास बंदी आणली.
बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसर्गिक न्याय हक्क,जल,जंगल, संपत्तीसाठी व होणाऱ्या अन्याय,शोषण,अत्याचाराविरुद्ध संघर्ष केला.आदिवासी हा निसर्गत:च 'उदार व मानवतवादी'व निसर्गालाच आपले दैवत मानत असल्याने जल,जंगल,संपत्तीचे रक्षण हे फक्त स्वतःसाठीच नव्हे तर भविष्यातील भारतातील मानवाच्या अस्तित्वासाठी आहे.परंतु,स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही आदिवासी हिताचे संविधानिक पाच व सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी होत नाही,विकासाच्या नावाखाली जंगलसंपत्ती उद्योगपतींच्या घशात टाकत आहे.जबरदस्तीने आदिवासींच्या जमिनी हडपणे,वाढती बोगस घुसखोरी,आदिवासींच्या संविधानिक नोकऱ्यांवर डल्ला,मंजूर कल्याणकारी विकास निधी इतरत्र वळविणे,भ्रष्टाचाराची लागलेली कीड,नियोजन शून्य कारभार यामुळे आजही आदिवासी उपेक्षितांचे जीवन जगत आहे.आदिवासी बाबत कोणतेही निर्णय हे गैरआदिवासी लोकप्रतिनिधी घेत असल्याने बिरसा मुंडा जयंती दिवस म्हणजे १५ नोव्हेंबर या दिवसालाही वर्चस्ववादी संस्था किंवा सरकार यांनी 'जनजाती गौरव दिन'म्हणून घोषित केला हे दुर्दैव.आदिवासी शब्दाऐवजी जनजाती व वनवासी शब्दप्रयोग का केला जातो?यात आदिवासींचे अस्तित्व नष्ट करण्याचे एक मोठे षडयंत्र आहे का? मुळात: ९ ऑगस्ट हा 'जागतिक आदिवासी दिन' व १३ सप्टेंबर 'जागतिक आदिवासी अधिकार दिन'असतो.धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चिकित्सक वृत्तीने अभ्यास.वैचारिक जनजागृती करून आपले संविधानिक नैतिक अधिकार संघटितपणे देशासमोर मांडले पाहिजेत.आपले जल,जंगल,संपत्ती,अस्तित्व व न्याय हक्कासाठी *उलगुलान* करण्यासाठी सज्ज राहूया आणि धरतीआबा बिरसा मुंडांना हेच खरे अभिवादन ठरेल...
✍️ राजेंद्र पाडवी
मो.९६७३६६१०६०
(लेखक - बिरसा आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व 'उलगुलान' पुस्तकाचे लेखक आहे.)