नंदुरबार दि ९ (प्रतिनिधी) विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक दत्तात्रय कराळे यांचा नंदुरबार जिल्हयात दोन दिवसीय वार्षिक निरीक्षण दौरा पार पडला. सदर दौऱ्यादरम्यान श्री. कराळे यांचेकडून जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात येऊन जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना बावत गुन्हे बैठकीत मार्गदर्शनपर सुचना करण्यात आल्या.
या वार्षिक निरीक्षण दौऱ्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी शासनाकडून नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 05 नवीन वाहनांचे लोकार्पण मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तातडीने घटनास्थळी पोहोचणे तसेच नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे सुलभ होणार आहे.
सदर कार्यक्रमावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार व शहादा उपविभाग दत्ता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा उपविभाग सुभाष भोये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी अंमलदार, कार्यालयीन स्टाफ असे उपस्थित होते.