Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आनंदनाथ भवन हे केवळ घर किंवा निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे- शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
आनंदनाथ भवन हे केवळ घर किंवा निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे- शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे 

पहलगाम मध्ये दहशतवादी हल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना शहीद झालेला घोडेवाला सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबियांना शिवसेनाने "आनंदनाथ भवन” नवीन घर बांधून दिले.

जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना शहीद झालेला घोडेवाला सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबियांना नवीन घर बांधून देण्याबाबत दिलेल्या शब्दाची परिपूर्तता आज करण्यात आली. यावेळी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कश्मिरी नागरिकांशी व्हिसीद्वारे संवाद साधला. 

धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे. एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार या हल्ल्यात एका क्षणात हिरावला गेला, पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात कोरलं गेलं आहे, असे यावेळी शिंदे साहेबांनी स्पष्ट केले. 
 
शिवसेना पक्षाच्या वतीने त्यावेळी आदिलच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत केली होती. त्यासोबतच त्याचे पक्के घर बांधून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. ते वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या नव्या घराला आज “आनंदनाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असल्याचे यावेळी शिंदे साहेबांनी नमूद केले.

‘आनंदनाथ भवन हे केवळ घर किंवा निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे,’ असे याप्रसंगी शिंदे साहेबांनी अधोरेखित केले. ‘आम्ही जे बोलतो, ते करतो आणि जी कमिटमेंट देतो ती पूर्ण करतो, हीच शिवसेनेची ओळख आहे,’ असे ठामपणे सांगत शिंदे साहेबांनी आदिल यांच्या कुटुंबाला विश्वास दिला. ‘तुम्ही एक आधार गमावला आहे, पण संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे,’ असेही यावेळी शिंदे साहेबांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्याहस्ते या घराची फित कापून हे घर आदिलच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. 

यावेळी मंत्री संजय शिरसाट, मंत्री योगेश कदम, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सरहद्द संस्थेचे संचालक संजय नहार, युवासेनेचे बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव कोकण विभाग विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य अभिमन्यू खोतकर, अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमीज रजा, अपर अधीक्षक फारुख अहमद, जम्मू-काश्मीर शिवसेना प्रमुख अश्विनी कुमार गुप्ता, राज्य सचिव मोहम्मद शकील मोगरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.