महाराष्ट्र राबवणार देशातील पहिले "एकल महिला धोरण"
स्व. अजित पवारांच्या धोरणाला मंत्री आदिती तटकरेंनी दिले मूर्त रूप
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क मुंबई
महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उन्नतीसाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच राज्याचे निश्चित असे एकल महिला धोरण अस्तित्वात येणे गरजेचे आहे. याच धोरणाच्या आखणीसाठी एकल महिला धोरण मसुदा समिती गठीत करण्यास मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने मान्यता दिली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार हयात असताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत त्यांनी एकल महिलांच्या हितासाठी राज्यव्यापी धोरण राबविण्याची तयारी सुरू केली होती. त्यांच्या पश्चात आदिती तटकरे यांनी या दिशेने आपले प्रयत्न सुरूच ठेवले, या समितीच्या निर्मितीने त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली ही मसुदा समिती काम करेल. या समितीत महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक पक्षाचे पोलीस महानिरीक्षक, तसेच शालेय शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग व पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त या समितीवर सदस्य म्हणून काम करतील. तसेच, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक, ग्रामविकास, नगर विकास व महसूल विभागाचे सहसचिव / उपसचिव, राज्यविधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी, नगरपरिषद संचालनालयाचे संचालक, उद्योग संचालनालयाचे संचालक, कौशल्य विकास विभागाचे संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माविमचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव हे समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतील. महिला व बालविकास आयुक्ताल, पुणे येथील उपायुक्त या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असतील.
एकल महिला धोरणास आकार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या या समितीच्या माध्यमातून राज्यातील एकल महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणारा 'एकल महिला धोरण मसुदा' आकारास येईल हा विश्वासही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया -
आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रम राबवण्याबाबत सह्याद्री अतिथिगृह येथे दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीत एकल महिलांच्या हितासाठी आदरणीय दादांनी मांडलेले विचार या समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष आकार घेणार आहेत. आदरणीय दादांच्या प्रेरणेने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे याचा मला विशेष अभिमान वाटतो.*
--आदिती वरदा सुनील तटकरे
मंत्री, महिला व बालविकास विभाग