Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून कोणाचाही अर्ज बाद नाही; तांत्रिक कारणांमुळे लाभ स्थगित झालेल्या भगिनींनी महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा!

मुंबई दि २ (प्रतिनिधी) "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून कोणत्याही पात्र भगिनीचा अर्ज बाद करण्यात आलेला नाही. तांत्रिक निकष किंवा पडताळणीमुळे ज्यांचे लाभ तात्पुरते स्थगित झाले आहेत, त्या सर्व प्रकरणांची महिला व बालविकास विभागाकडून पुन्हा पडताळणी केली जाईल. महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

योजनेच्या पात्रता निकषांपैकी, वयाचे आणि उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली आहे. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे, अशांची माहिती RTO विभागाकडून, तर काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची माहिती संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. याशिवाय, काही अर्जदारांनी विहित कालावधीत e-KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांचा लाभ स्थगित झाला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे  आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि अर्जाच्या पुनरपडताळणीसाठी तातडीने महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन  केले आहे.
मंत्री आदिती तटकरे 
विभागीय संपर्क अधिकारी,
महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन.