नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील देसाईपुरा परिसरात राहणारे फिर्यादी रविंद्र दंगल मराठे यांच्या राहत्या घराच्या ओट्यावरून दि. १९/०७/२०२६ रोजी रात्री ते दि. २०/०७/२०२६ रोजी पहाटे दरम्यान सुमारे ६,०००/- ₹ किंमतीची शगुना कंपनीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात पाण्याच्या मोटारी चोरीच्या वारंवार तक्रारी येत असल्याने सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत गांभीर्याने हाती घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तात्काळ तपासासाठी रवाना करण्यात आले.
तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीत चंद्रशेखर नथ्थु मेश्राम, रा. चिंचपाडा भीलाटी, नंदुरबार याचा शोध घेण्यात आला. त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने नंदुरबार शहर परिसरातून अशाच प्रकारे एकूण ७ पाण्याच्या मोटारी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या वेग वेगळया कंपनीचा ७ पाण्याच्या मोटारी हस्तगत केल्या असून त्यापैकी काही मोटारींचे मालक अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या पाण्याच्या मोटारी अलीकडील काळात चोरीस गेल्या असतील त्यांनी मालकीचे कागदपत्र अथवा पुराव्यासह नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.
नंदुरबार शहर पोलिसांनी अत्यल्प कालावधीत गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे नागरिकांकडून या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, भुणेश मराठे, पोहेकॉ जगदीश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड, राजेंद्र कटके, रुपेश पगारे, विवेक ठाकरे, अनिल बसावे, नरेंद्र पाडवी व मपोकों/निंबा वाघमोडे सर्व नेम. नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ जगदीश पाटील करीत आहेत.