तळोदा दि 27 (प्रतिनिधी) गटप्रवर्तक आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करा, मोबदला वाढ करा यासाठी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे दिल्ली येथे जंतरमंतरवर दिनांक 28 रोजी देशव्यापी धरणे आंदोलन व मोर्चा होत आहे. त्यासाठी जिल्हाभरातून गटप्रवर्तक व आशास्वयंसेविकांनी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
गरीब ,दुर्लक्षित ,गरजू जनतेला सहजसाध्य परवडण्याजोगी ,कार्यक्षम, उत्तरदायी व विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरवण्यासाठी 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले.
सध्या देशात राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे आठ लाख आशा स्वयंसेविका व सुमारे चाळीस हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत .देशस्तरावर आशा स्वयंसेविकांना माहिती व अहवालाचे अचूक संकलन, व्हिएचएनएएससीची मासिक सभा, व्हीएचएनडी व प्राथमिक आरोग्य स्तरावरील मासिक सभा या मंजूर कामाकरिता दरमहा दोन हजार रुपयांचा मोबदला देण्यात येतो. याव्यतिरिक्त आशा स्वयंसेविकांना विविध कामांसाठी कामावर आधारित मोबदला दिला जातो.तसेच सुमारे दहा आशा स्वयंसेविकांच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे काम पूर्ण वेळ असून त्यांना प्रवास खर्च मिळवून केंद्र शासनाकडून दरमहा 8475 रुपये इतका मोबदला मिळतो. यातील बहुतेक रक्कम टीएडीए साठी खर्च होते. घर खर्च, कूटुबासाठी काहीच रक्कम शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत गटप्रवर्तकांना तृतीय श्रेणी देऊन व आशा स्वयंसेविकांना चतुर्थ श्रेणी देऊन देऊन कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 2018 पासून गतप्रवर्तक व आशांच्या मोबदल्यात केंद्र सरकारने वाढ केली नाही. त्यांना किमान वेतन देऊन सन्मान करावा. गटप्रवर्तकांना दरमहा 26000 रुपये व अधिक प्रवास भत्ता द्या तसेच आशास्वयंसेविकांना दरमहा 24 हजार रुपये त्वरित द्या अशी मागणी आयटक संलग्न अखिल भारतीय आशा व गटपप्रवर्तक फेडरेशनने केली आहे.यासाठी दिनांक 28 मंगळवार रोजी दिल्ली येथे जंतरमंतर येथे देशभरातील आशा, गटपप्रवर्तक एकत्र येत असून आंदोलन करणार आहेत .त्यासाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक मोठ्या संख्येने दिल्लीला रवाना झाल्या आहेत.