शिक्षकांच्या कामचुकारपणाने दुर्गम पाड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान! - राजेंद्र पाडवी राज्य महासचिव बिरसा फायटर्स
तळोदा(प्रतिनिधी)तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक शाळेवर जात नसल्याचे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.अशी तक्रार आल्याने याविषयावर गांभीर्याने लक्ष देण्यासाठी बिरसा फायटर्सने तळोदा विस्तार अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना निवेदन पाठवले आहे.निवेदनात म्हटले आहे की,शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शाळेपासूनच चांगला तयार करण्यासाठी पालकांसह शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.परंतु,काही आदिवासी दुर्गम पाड्यातील जि.प.शाळेतील कामचुकार शिक्षक अनेक दिवस शाळेतच न जाणे,उशिराने शाळेवर येणे,आल्यावर अध्यापन न करणे असे प्रकार निदर्शनास येत आहे.त्यामुळे संबंधित शिक्षक भावी पिढीचे शैक्षणिक नुकसान करत आहे.तालुक्यातील काही शिक्षक शाळेत जातात.मात्र, बऱ्याच ठिकाणी एक-दोन तास शाळेत उशिराने येत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हिच परिस्थिती अक्क्ककुवा व धडगांव तालुक्यातील दुर्गम भागातील शाळेची आहे असे सांगितले जाते.शिक्षकांनी आपले अध्यापणाचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे.मात्र,दुर्गम पाड्यात अनेक शिक्षक कामचुकारपणा करून विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करतात हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. अशा शाळेतील शिक्षकांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी व जिल्ह्यातील सर्वच जि.प.शिक्षकांना सूचित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर बिरसा फायटर्स राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष भरत पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,रापापूर पाल्हाबार शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,सल्लागार गणेश पाडवी, स्वप्निल ठाकरे यांच्या सह्या आहेत.
*राजेंद्र पाडवी राज्य महासचिव बिरसा फायटर्स*
'दुर्गम पाड्यातील काही कामचुकार शिक्षकांमुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते हे अतिशय दुर्दैव आहे.पालक व ग्रामस्थांनी आपल्या पाड्यातील शाळेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पुढचा में महिन्यात बिरसा फायटर्स गाव-पाड्यात शैक्षणिक जनजागृती करणार'