धडगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ व नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तोरणमाळ, ता. धडगाव येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय शैक्षणिक कृतीसत्र घेण्यात आले. या कृतीसत्रात दप्तराचे ओझे कमी करणे तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या या विषयांवर शोधनिबंध सादर करून त्यावर मंथन करण्यात आले.
या कृतीसत्राचे उद्घाटन राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व कोकण शिक्षण मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे विद्या सचिव महेंद्र गणपुले, सचिव शांताराम पोखरकर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सहसचिव व नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, संदेश राऊत, भरत मोजर, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, उपाध्यक्ष जयदेव पाटील, उपाध्यक्ष निमेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष डी.डी. साळुंके, लक्ष्मीकांत पाटील, के. डी. मराठे, के. जी. पाठक, डॉ. संध्या पटेल, सुनील परदेशी,, मनोहर साळुंखे, विश्वनाथ चौधरी आदी उपस्थित होते. प्रसंगी गो हू महाजन हायस्कूल व शि ल माळी कनिष्ठ महाविद्यालयातून नूकतेच सेवानिवृत्त झालेले प्राचार्य अजित टवाळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार म्हात्रे यांनी पेन्शनसंदर्भात शिक्षकांचे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, २००५ पूर्वी मान्यता मिळालेल्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षक नियमात असूनही त्यांना पेन्शन नाकारली गेली आहे. या शिक्षकांचे मुंबईत आंदोलन झाले आहे, त्या शिक्षकांना आपण कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेत आवाज उठवू, अशी ग्वाहीही दिली.