संभाजीनगर:- सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनजागरण सभेत बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला असून कालीचरण महाराज यांच्यासह सिल्लोड येथील भाजपचे शहराध्यक्ष आणि इतर चार लोकांविरुद्ध विविध कलमानव्ये सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे शनिवारी (13 मे रोजी) हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी रुद्राक्ष वाटप करण्यात आले. त्यामुळे सभेसाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित पाहायला मिळाली. मात्र यावेळी बोलताना कालीचरण महाराज आणि आयोजकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आणि सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी स्वतः फिर्यादी होऊन या तक्रार दिल्याने रविवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्यात कालीचरण महाराज आणि सिल्लोड येथील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया, या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते सुनिल त्र्यंबक जाधव (मोढा बुद्रुक), आरएसएसचे बौद्धिक जिल्हाप्रमुख केतन कल्याणकर (रा. सिल्लोड) या चार लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यतीन कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हे मागे घेण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या सभेत राडा झाला नाही कुणाची मने दुखावली नाही किंवा कुणी नागरिकांनी यावर आक्षेप घेतला नाही. असे असताना केवळ राजकीय षडयंत्रामुळे पोलिसांनी दबावाखाली भाजप पदाधिकारी व कालीचरण महाराज यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला असून हे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी भाजप पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे.