अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा
अक्कलकुवा येथील पंचायत समितीला भारतीय प्रशासन सेवेतून आलेले पुलकीतसिंग यांची गट विकास अधिकारी या पदावर परीविक्षाधीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून पहिल्या दिवसापासूनच संबंधित अधिकाऱ्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रांना भेटी सुरू केल्याने तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच शिस्त निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की पुलकीतसिंग हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी या पदाचा त्यांना स्वतंत्र कार्यभार दिनांक 15/ 5 /2023 ते 9/ 6 /2023 पर्यंत सोपविण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी पुलकीत सिंग यांचा सत्कार केला.
काल पुलकितसिंग यांचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवशी तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या असल्याचे समजते. त्याच पद्धतीने पंचायत समिती कार्यालयातील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येक विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्याच्या नोंदी ठेवत असल्याचे दिसून आले. नंदुरबार येथे काही काळासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असताना नंदुरबार शहरातील वर्षानुवर्षांपासून वाहतुकीला अडथळा ठरणारे सुशोभीकरणाच्या नावावर असलेले चौका चौकातील मोठमोठी बांधकामे त्यांनी तोडण्याचा धाडसी निर्णय घेतल्यामुळे शहरातील रस्ते मोकळे झाले व अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असल्याने देखील शहरातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अशाच प्रकारे जर अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांकडून शिस्तीने काम झाले तर नक्कीच जनतेचे प्रश्न या ठिकाणी सुटू शकतात व जनतेला न्याय मिळू शकतो.व कर्मचाऱ्यांवर देखील वचक बसू शकतो.तसेच अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारी राज असल्याने सर्व ऑल इज वेल सुरू असल्याचे दिसून येते.त्यामूळे कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.