अक्कलकुवा (प्रतिनिधी) देवमोगरा पुनर्वसन ता अक्कलकुवा पूनर्वसन येथील सुरेश भाईदास वसावे या बालकाला बिबट्याने उचलून नेऊन लचके तोडून ठार केले होते. त्याचा वारसांना वन विभागाच्या वतीने आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
देवमोगरा पुनर्वसनच्या शेत शिवारात शेताच्या घराच्या अंगणात खेळत असतांना अचानकपणे बिबट्याने हल्ला करुन सुरेश भाईदास वसावे या बालकाला बिबट्याने मकाच्या शेतात फरपटत नेत त्याच्या शरीराचे लचके तोडून त्याला जागीच ठार केले होते. याबाबत आ. आमश्या पाडवी यांनी घटनास्थळीत धाव घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन परिसरातील शेतात मृत बालकाचा शोध घेतला होता. त्यानंतर स्वतः ग्रामीण रुग्णालयात जात बालकाचे शवविच्छेदन करुन अधिकाऱ्यांना अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, बालकाच्या वारसांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ. आमश्या पाडवी यांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे वन विभागाच्या वतीने सुरेश वसावे या बालकाच्या वारसांना वन विभागाने तात्काळ वीस लाख रुपये भरपाई म्हणून मंजूर केले आहेत. त्यानुसार देवमोगरा पुनर्वसन येथील ग्रामपंचायत कार्यालयात आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश बालकाच्या वारसांना देण्यात आला. यावेळी सुरेश वसावेचे वडील भाईदास न्हाल्या वसावे व आई नोवीबाई भाईदास वसावे यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला. याप्रसंगी तळोदा वन विभागाचे उपवनसंरक्षक एल. एम. पाटील, अक्कलकुव्याचे वनक्षेत्रपाल ललित गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक, देव मोगरा पुनर्वसन येथील सिंमजी नाईक, जयंती पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी आ. आमश्या पाडवी, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी ग्रामस्थांना वन्य हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारात जाताना एकटे जाऊ नये, जोर जोरात आवाज करत रस्त्याने जावे तसेच ग्रामस्थांनी घराच्या अंगणात किंवा शेत शिवारात बाहेर झोपू नये असे आवाहन केले.