नंदुरबार दि २३(प्रतिनिधी)आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दुर्गम क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून आदिवासी भागात सरकारी व खाजगी क्षेत्रातील रूग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना, आरोग्य कर्मींना नियमित वेतन,मानधनाबरोबर रूग्णसंख्येच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात 20 खाटांच्या मॉड्युलर, सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र खेडकर डॉ. राजेश वसावे, डॉ. श्रीमंत चव्हाण,डॉ. नरेश पाडवी, जिल्हा रूग्णालय,वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालयातील आरोग्यकर्मी, विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मॉडयूलर आयसीयू आणि प्रियाटिक आयसीयूचा उद्घाटन व लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई, पुणे, नाशिक सारख्या रुग्णालयाप्रमाणेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आयसीयू तयार करण्यात आलेला आहे. या आयसीयुमुळे आदिवासी दुर्गम भागातील प्रकृती प्रसुतीसाठी आलेल्या महिलांसाठी मोठा फायदा होणार आहे.