• आजची गझल • (भाग ४६ )
🌹तिला दडपण असू शकते🌹
व्यथेलाही सुबक सुंदर असे झाकण असू शकते
मनाच्या कोंदणाला तर सुई, दाभण असू शकते
उपाशी पाखरे सारी कशी निजतील सांगा ना
भुईवर रान पिकल्यावर तिथे गोफण असू शकते
किती स्पर्शून जातो ना तिचा साधेपणा कायम
तिच्या संयम नि त्यागाला तसे कारण असू शकते
तिच्या वाटेत दु:खाची किती आंदोलने कायम
तरी दारी समाधानी सुखद तोरण असू शकते
घराच्या लिंपते भिंती गिलाव्याने मनाच्या स्त्री
छतासाठी तिची स्वप्ने कुठे तारण असू शकते
जरा पाहून टाकत ये तुझे पाऊल रानावर
मृदेखाली बियाण्यांचे नवे रोपण असू शकते
वलय आहे तिचे वरवर जगावरती उमटलेले
खरे नाटक वठवताना तिला दडपण असू शकते
दिपाली सुशांत
कारंजा (लाड)
जि. वाशिम
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=