फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार आणि राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भेट
नंदूरबार दि ३१(प्रतिनिधी) पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि मौसम सेवा अंतर्गत डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे जिल्हा कृषि हवामान केंद्र २०१९ पासून कार्यरत आहे.
जिल्हा कृषि हवामान केंद्रामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, माहिती, इशारे, हवामान आधारित कृषि सल्ला इत्यादी माहिती दिली जाते. कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्रास फलोत्पादन आयुक्त, कृषि मंत्रालय, भारत सरकार डॉ. प्रभात कुमार, महाराष्ट्र राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सहायक आयुक्त, राष्ट्रीय बांबू मिशन, कृषि मंत्रालय श्री. के. एस. श्रीकांत, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी बिबवे, बांबू तज्ज्ञ करपे तसेच डॉ. हेडगेवार सेवा समितीचे उपाध्यक्ष जत्र्या पावरा आणि सचिव डॉ. नितीन पंचभाई यांनी भेट दिली.
भेटीदरम्यान डॉ. प्रभात कुमार व पाशा पटेल म्हणाले की, शेती क्षेत्रासमोर येत्या काळात हवामान बदलाचे मोठे संकट असून यामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा कृषि हवामान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणारी माहिती अतिशय महत्वाची असून त्यामुळे शेती कामाचे हवामानानुसार योग्य नियोजन केल्यास नुकसान कमी करण्यास मदत होते. त्यासोबतच जिल्हा कृषि हवामान केंद्राचे माहिती पत्रकाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन केले.
विषय विशेषज्ञ, कृषि हवामान श्री सचिन फड यांनी भारतीय हवामान विभागाकडून बसविण्यात आलेल्या स्वयंचलित कृषि हवामान यंत्र, त्यामध्ये दैनंदिन घेण्यात येण्याऱ्या हवामानाच्या नोंदी आणि दर मंगळवारी आणि शुक्रवारी देण्यात येणारा हवामान अंदाज (तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा वेग, ढग स्थिती), आणि त्यावर आधारित पीकनिहाय कृषि हवामान सल्ला पत्रिकेविषयी, शेतकऱ्यांकडून प्राप्त होणारे प्रतिसाद तसेच येत्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत हवामानाची माहिती पोचवण्याचे प्रयत्न करण्यात येत असून प्रत्येक गावाचा Whats App ग्रुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.