Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आ.आमशा पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे देहली ता.अक्कलकुवा धरणाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार

आ.आमशा पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे देहली ता.अक्कलकुवा  धरणाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची माहिती आमदार आमश्या पाडवी यांनी दिली आहे. 
      नंदुरबार दि ३१ (प्रतिनिधी)जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या मौजे आंबाबारी येथील देहली धरणाला सुमारे 40 वर्षांपूर्वी मान्यता मिळाली होती. त्यावेळी सदरच्या कामास 3.95 लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र धरणाच्या प्रत्यक्ष कामाला 90 च्या दशकात सुरुवात झाली. या करिता धरण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यात आले.
 या धरणाच्या पूर्णत्वाने अक्कलकुवा तालुक्यातील हजारो हेक्टर शेत जमीन ही सिंचनाखाली येणार आहे त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील हा दुर्गम भाग सुजलाम सुफलाम होईल एवढीच माफक अपेक्षा आदिवासी जनतेची आहे. मात्र दरम्यानच्या काळात असलेल्या पुनर्वसनाच्या अनेक अडचणींमुळे सदरचे काम हे थंड बस्त्यात पडून राहिले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना धरणाचा लाभ होणे तर दूर त्यातले पाणी देखील वापरण्याची परवानगी शासन देत नव्हते. हीच बाब विधान परिषद सदस्य आ. आमश्या पाडवी यांनी 2023 च्या प्रथम अर्थसंकल्पिय अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर धरणाच्या कामास फास्ट ट्रॅकवर घेऊन एक महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करुन तात्काळ पूर्ण निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. उप मुख्यमंत्र्यांनी महिन्याभराचे आश्वासन पाळले नाही मात्र आमदार आमश्या पाडवी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दि. 11/08/2023 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे करिता जलसंपदा विभागास प्रस्ताव सादर केला. या प्रकरणाचा मागोवा घेत आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना जलसिंचन व इतर बाबी करिता विशेष बैठक घेण्यास भाग पाडून अधिकारी वर्गाला देहली प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तावा संदर्भात आवश्यक सूचना दिल्या होत्या. 
      त्या अनुषंगाने आमदार आमश्या पाडवी यांनी नुकतेच दि. 26/10/2023 रोजी मुंबई येथे अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) यांच्या कार्यालयात भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेऊन चर्चा केली. त्यानुसार प्रकल्पाच्या ४७०.७१ कोटीच्या सुधारित प्रशासकीय मानायतेस जलसंपदा विभागाने मान्यता दिली असून वित्त व नियोजन विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले त्यामुळे त्यास तात्काळ मान्यता मिळावी याकरिता वित्त व नियोजन विभागात देखील भेट घेतली. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर विषय पारित होऊन निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार आमश्या पाडवी यांना देण्यात आले असल्याची माहिती आमदार पाडवी यांनी दिली.      
        देहली प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे अक्कलकुवा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आमश्या दादा पाडवी यांनी सांगितले.