तळोदा(प्रतिनिधी)जिल्ह्यात शेतमाल हमी भावापेक्षा अल्प दरात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याने बिरसा फायटर्सने तहसीलदार तळोदा मार्फत मुख्यमंत्री,कृषिमंत्री,कृषी सभापती यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,२०२३-२४ साठी मका पिकाला हमीभाव २०९० रुपये जाहीर केलेला असतांना देखील जिल्ह्यात बऱ्याच खरेदी केंद्रावर अल्प दरात म्हणजे १२५० ते १४०० रु.पर्यत खरेदी करून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत असल्याचे लक्षात येत आहे.अगोदरच जिल्ह्यातील शेतकरी अनियमित पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.जिल्ह्यातील गरीब शेतकरी अचानक येणाऱ्या नैसर्गिक संकटाच्या सामना करत,दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करून थोडेफार पिकवलेले शेतमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन येतो;तेथे आल्यावर मात्र जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा अल्प दराने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतमाल हिसकावून लूटमार करतांना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणे कठीण होत आहे.शेतमालाला चांगला भाव मिळेल; या आशेने जिल्ह्यातील अनेक गरीब शेतकरी उसनेवारीने,कर्ज काढून बी -बियाणे,खत,औषधे व मजूरीसाठी हजारो रुपये खर्च करतो.काबाडकष्ट करतो.परंतु,शेतकऱ्यांच्या शेतमाल कवडीमोलाने खरेदी करून लूटमार होते;हे किती दुर्दैव आहे.हमी भावापेक्षा एवढ्या कमी दरात मका खरेदी केले जाते;याचा अर्थ व्यापाऱ्यांना राजकीय वरदहस्त आहे का?असा प्रश्न उपस्थित केला आहे.हमी भावापेक्षा अल्प दरात मका,किंवा इतर शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अन्यथा,शेतकऱ्यांसह बिरसा फायटर्स तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,जिल्हा सल्लागार अड.गणपत ठाकरे,सहसचिव सतीश पाडवी, मेंढवड उपाध्यक्ष अजय वळवी,संघटक किरण वळवी,मोदलपाडा शाखाध्यक्ष रोहिदास वळवी,रमेश पाडवी,दिलीप पाडवी,वसंत पाडवी,रनेश वळवी,रविंद्र पाडवी ,जालमसिंग वळवी,रननिश वसावे,शांताराम वळवी,राजकुमार पाडवी,दिलीप वळवी,निंबा पवार आदी.कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.