तळोदा दि १२ ( प्रतिनिधी) महाराष्ट्रातील राजकारणाचा जनतेला कंटाळा आल्यामुळे अमरधाम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे सामुहिक श्राद्ध घालुन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाची तालुक्यात चर्चा सूरू झाली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी स्मशान भूमी मध्ये जाऊन अनोखे आंदोलन केले आहे. गुरूवार रोजी तळोदा येथील अमरधाममधील स्मशानभूमीत जाऊ महाराष्ट्रात सूरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचे धिंडवडे काढले आहे. गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणामुळे अनेकांच्या मनात सभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील कुठला पक्ष खरा व खोटा तसेच कुठला पक्ष कुणाकडे आहे असे संभ्रम महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सूरू आहे. आपली पोळी भाजण्यासाठी सर्वसामान्य जनतेला फसवले जात आहे. हे सामान्य जनतेला न पटणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ह्या गलिच्छ राजकारणाचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सामुहिक श्राद्ध घालण्यात आले. तसेच यात कोणत्याही राजकीय नेते व कार्यकर्ते यांना दुखाविण्याचा प्रयत्न नसल्याचे ही सांगण्यात आले.
यावेळी सेनेचे तालुका अध्यक्ष विपुल राणे, तालुका उपाध्यक्ष जयदास वळवी, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र बडगुजर, तालुका सचिव विवेकानंद महाले, शहराध्यक्ष सुधाकर माळी, शहर उपाध्यक्ष किरण माळी, पुष्पेन्द्र मराठे, शुभम कर्णकार, गणेश नवले, महेश गुरव, मनोज कोळी, रसिकलाल माळी, रत्नाकर वाघ, पुरोहित, अथर्व टोपले इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.