अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशभरात 5 लाख मंदिरांत होणार विशेष कार्यक्रम
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ३ नोव्हेंबर
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी अर्थात 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सव साजरा होण्याचे नियोजन मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. अयोध्येत जेव्हा 22 जानेवारी रोजी रामलला विराजमान होतील तेव्हा देशभरातील साधारण पाच मंदिरामध्ये विशेष कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे 22 जानेवारी रोजी सर्वांना अयोध्येत जाता येणे शक्य होणार नसले तरीही सर्व देशवासीयांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे समाधान मिळू शकणार आहे.
यासाठी 5 नोव्हेंबर रोजी देशभरातल्या 45 प्रांतांमधून अयोध्या धाम येथे कार्यकर्ते येणार आहेत ज्यांना पूजित अक्षता देण्यात येणार आहे.हे सर्व कार्यकर्ते, या पूजन केलेल्या अक्षता आपापल्या प्रांतात घेऊन जातील. या पुजीत अक्षतांच्या माध्यमातून देशभरातल्या सर्व शहरे, गांवे व खेड्यांतल्या जन सामान्यांना आमंत्रित केले जाईल. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र नुसार, पूर्ण 45 दिवसांपर्यंत हे महाअभियान टप्याटप्याने राबविले जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, 4 नोव्हेंबर 2023 रोजी 200 कार्यकर्ते अयोध्येत पोहचणार आहेत. 5 नोव्हेंबर रोजी तेथून पूजलेल्या अक्षताने भरलेले पितळी कलश घेऊन जातील. या अक्षता न्यासा कडून देण्यात येणाऱ्या आमंत्रणाचे प्रतिक असणार आहेत. 5 नोव्हेंबर पासून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे सर्व कार्यकर्ते देशभरातल्या सर्व मंदिरांत या अक्षता पोहोचवतील. 01 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत या पूजलेल्या अक्षता घेऊन कार्यकर्ते प्रत्येक गांवातल्या गल्ली–वस्तीत संपर्क करुन सर्वांना या उत्सवात सामील होण्याचे औपचारिक निमंत्रण देतील. प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी 22 जानेवारीला सर्व कार्यकर्ते आपापल्या गांवातल्या गल्ली-वस्तीतल्या मंदिरात एकत्र येतील. त्याठिकाणी भजन कीर्तनासारखे सत्संग चालतील. तसेच सायंकाळी सर्व जण आपापल्या घरीदारी दीप प्रज्वलित करतील.
22 जानेवारी च्या दिवशी अयोध्येत केवळ काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत चे 140 संप्रदायांचे साधु-संत, पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक तसेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करणाऱ्यांचे आप्त-स्वकीय, वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले समाजातील प्रतिष्ठित व विशिष्ट नागरिक उपस्थित राहतील. या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात फक्त 8000 लोकांची मर्यादित उपस्थिती राहणार असल्यामुळे , सर्व कार्यकर्त्यांनी 22 जानेवारीला अयोध्या जाण्याऐवजी आपापल्या क्षेत्रात उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रांतांनुसार नेमून दिलेल्या वेगवेगळ्या दिवशी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले जाईल.
– विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#राममंदिर #अयोध्या #RamMandirAyodhya