सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ३०
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ३७३ गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका फडकवित शिवप्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमात दहा हजारांहून अधिक शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. याबरोबरच केंद्र सरकारचे पुरातत्व खाते, राज्य सरकारचे पुरातत्व खाते, स्थानिक पोलिस प्रशासन व इतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सहसचिव राहुल मेश्राम, खजिनदार दीपाली भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगाच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला होता. यामध्ये महासंघाकडे नाव नोंदणी करून आपल्या जिल्ह्यातील किल्ल्यावर जाऊन शिवप्रेमी या उपक्रमामध्ये सहभागी झाले. या उपक्रमामध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील एकूण १७७ संस्था सहभागी झाल्या, यातील किल्ले वसई मोहीम यांनी ३४, वायएचए कांदिवली यांनी १६, दुर्ग प्रतिष्ठान सांगली यांनी ११, डीएमए जळगाव व वाय. झेड ट्रेकर्स यांनी प्रत्येकी दहा किल्ल्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली.
याबाबत महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे म्हणाले, श्री शिव छत्रपती हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. सर्वसमावेशक हिंदवी स्वराज्याची त्यांनी पायाभरणी केली. या भक्कम पायावरच आजची भारतीय लोकशाही मजबूतपणे उभी आहे. या हिंदवी स्वराज्याचे २०२३- २४ वर्ष हे ३५० वे वर्ष. या सर्वांना एका धाग्यात गुंफणारा हा उपक्रम होता या उपक्रमाला तमाम शिवप्रेमींनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे.जय शिवराय!!!