शिक्षक आमदार किशोर दराडे यांची सभागृहात मागणी
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि १
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे दि २८ व २८ फेब्रुवारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मुंबई येथे दोन दिवसीय आंदोलन करण्यात आले.यावेळी घोषणाबाजी करत जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली.
विधिमंडळ अधिवेशनात सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिक्षक बांधवांच्या जुन्या पेन्शन योजनेचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसून त्यासाठी कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्याबद्दल शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली.
शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा व शिक्षक बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी करत पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी असते त्यामुळे आयुष्यभराच्या त्यांच्या सेवेची दखल घेण्याची गरज असल्याचे आमदार दराडे म्हणाले,याचवेळी अजूनही अनेक शिक्षक टप्पा अनुदानावर काम करत असल्याने त्यांना शंभर टक्के अनुदान देऊन पूर्ण वेतनावर काम करण्याची संधी देण्याची मागणी ही त्यांनी सभागृहात केली.
अनेक शाळांवर काही शिक्षक पूर्ण पगार घेतात तर काही शिक्षक २० किंवा ४० टक्केच पगार घेतात.काम मात्र सर्वांना सारखेच आहे, हा दुजाभाव आहे.अनेकांचे तर अर्धे आयुष्य २०/४० टक्क्यांवर निघून चालले असल्याने त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे करावे काय असा प्रश्न उपस्थित करत एकाच वेळी शंभर टक्के अनुदान देऊन राज्यातील सर्व शिक्षकांना १०० टक्के पगार सुरू करावा अशी मागणी आमदार दराडे साहेब यांनी सभागृहात केली.